शिराळ्यात जखमी उदमांजरला ‘प्लॅनेट अर्थ’कडून जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:30 AM2021-03-09T04:30:42+5:302021-03-09T04:30:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळ्यातील मोरणा धरणनजीक कदमवाडी येथे जखमी अवस्थेत उदमांजर सचिन कदम यांना आढळून आले. शिराळ्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळ्यातील मोरणा धरणनजीक कदमवाडी येथे जखमी अवस्थेत उदमांजर सचिन कदम यांना आढळून आले. शिराळ्यातील पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाया प्लॅनेट अर्थ फाउंडेशनच्या वन्यजीव आपत्कालीन सेवा पथकाने या उदमांजराला जीवदान दिले. वनविभाग आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार त्यावर उपचार सुरू आहेत.
जंगल, माळरान तसेच ऊसशेती अशा ठिकाणी या उदमांजराचा निवास असतो. लहान मांसभक्षक प्राणी म्हणून निसर्गामध्ये त्याची भूमिका फार महत्त्वाची आहे. उदमांजराचे उंदीर, साप, सरडे, पाली हे प्रमुख अन्न आहे. हा प्राणी पर्यावरणदृष्ट्या फार महत्त्वाचा आणि शांत असल्यामुळे लोकांना जखमी अवस्थेत दिसल्यास वनविभागाला फोन करावा, असे आवाहन वनक्षेत्रपाल सुशांत काळे यांनी केले आहे.
या उदमांजराला वाचविताना संस्थेचे उपाध्यक्ष प्रणव महाजन, वन्यजीव आपत्कालीन सेवेचे प्रमुख प्रा. सुशीलकुमार गायकवाड, राज पाटील, रणजित सातपुते उपस्थित होते.