नियोजन समिती बिनविरोधच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 11:43 PM2017-08-08T23:43:30+5:302017-08-08T23:43:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा नियोजन समितीची निवडणूक परंपरेप्रमाणे बिनविरोध करण्यावर मंगळवारी सर्वपक्षीय एकमत झाले. काँग्रेस-राष्टÑवादीच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेत एक अतिरिक्त जागा मागितली असून, जागावाटपाचा निर्णय मुंबईत उद्या, गुरुवारी होणाºया बैठकीत होणार आहे.
नियोजन समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेत भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, बाळासाहेब पाटील, पक्षप्रतोद चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख,जितेंद्र पाटील यांची संयुक्त बैठक झाली.
आपापल्या सदस्यसंख्येनुसार जागा मिळाव्यात, अशी मागणी बैठकीत सर्व पक्षांनी केली. मात्र जागांची अदलाबदल केली जाणार आहे. त्याबाबतही एकमत असल्याने नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने जिल्हा परिषदेतील एक जागा वाढवून मागितली आहे. त्यामुळे आघाडीला दहा जागा मिळण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजपकडून त्याबदल्यात नगरपंचायत अथवा नगरपालिकेतील एक जागा देण्यात यावी, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात आहे. मात्र सभापतीसह विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या आहेत. मागील दहा वर्षात समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ही परंपरा कायम ठेवण्याबाबत नेत्यांमध्ये चर्चा झाली. जागावाटप निश्चितीसाठी मुंबईत गुरुवारी बैठक होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या ६0 सदस्यांमधून २३ सदस्य जिल्हा नियोजन समितीवर निवडून जातील. सत्ताधारी भाजप आघाडीचे संख्याबळ ३५ आहे. आघाडीतील १४ सदस्य, काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्ष असे विरोधी आघाडीचे संख्याबळ २५ आहे. या संख्याबळानुसार जिल्हा नियोजन समितीवर विरोधी आघाडीचे ९ सदस्य निवडून जातील. काँग्रेसचे संख्याबळ दहा असून त्यांचे ४ सदस्य निवडून जातील. राष्ट्रवादी व एक अपक्ष यांचे संख्याबळ पंधरा असल्याने त्यांच्यामधून ५ सदस्य निवडून जाणार आहेत.
इस्लामपूर, आष्टा, तासगाव, विटा, पलूस, जत या सहा नगरपालिकांमधून तीनजण नियुक्त होणार आहेत. तीनही जागा आघाडीकडे जातील. कवठेमहांकाळ, कडेगाव, खानापूर, शिराळा या चार नगरपंचायतींमधून एक नगरसेवक समितीवर निवडून जाणार आहे. राष्ट्रवादीने, आ. जयंत पाटील यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले, तर काँगे्रसने, जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम व डॉ. पतंगराव कदम यांच्याशी याबाबत बोलणी सुरू असल्याचे सांगितले.