झाडे लावा, ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळवा; सांगलीत शिवकिसान फाउंडेशनतर्फे अनोखी स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 05:49 PM2024-07-01T17:49:58+5:302024-07-01T17:50:13+5:30
सांगली : येथील शिव किसान जनसेवा फाउंडेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज वृक्षारोपण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पहिले बक्षीस ५० ...
सांगली : येथील शिव किसान जनसेवा फाउंडेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज वृक्षारोपण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पहिले बक्षीस ५० हजार रुपयांचे आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या या प्रतिष्ठानमध्ये ११३ सदस्य असून, बहुतांश सैनिक आहेत. झिरो बजेट शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन, टेरेसवर रसायनविरहित भाजीपाला, बचत गटातील महिलांना कामे, आदी कामे केली जातात. संस्थेने जाहीर केलेल्या वृक्षारोपण स्पर्धेत जास्तीत जास्त झाडे लावणाऱ्या व त्यांचे संवर्धन करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
सहभागासाठी १५ जुलैपर्यंत नोंदणी करता येईल. १६ जुलै ते ३१ ऑगस्ट अखेर म्हणजे ४५ दिवसांच्या स्पर्धा काळात झाडे लावावी लागतील. एक सप्टेंबरपासून प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. ५ जूननंतर लावलेली झाडेही स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार आहेत.
प्रथम क्रमांकासाठी ५० हजार रुपये, द्वितीयसाठी ४० हजार, तृतीयसाठी ३० हजार व उत्तेजनार्थ स्वरुपाची १० हजार रुपयांची दोन पारितोषिके दिली जाणार आहेत. सहभागासाठी शिवकिसान फाऊंडेशन, लक्ष्मी मंदिर, कुपवाड रस्ता येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
असे आहेत गुण
वड, पिंपळ, लिंब, अशोक व अर्जुन या प्रत्येक झाडासाठी पाच गुण आहेत. फळझाडांसाठी ३ व इतर प्रकारांसाठी एक गुण आहे. पाणी व स्वच्छता व्यवस्थापनासाठी १०० गुण आणि झाडाच्या संरक्षणासाठी १०० गुण आहेत.