मिरजेत रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण
By admin | Published: July 25, 2016 12:42 AM2016-07-25T00:42:42+5:302016-07-25T00:46:12+5:30
सुंदरनगरमधील नागरिक आक्रमक : रस्ता दुरूस्तीसाठी केले अनोखे आंदोलन
मिरज : मिरजेतील सुंदरनगर येथील नागरिकांनी खड्डे व चिखलमय रस्त्याचे मुरुमीकरण, खडीकरण करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावरील खड्ड्यात प्रतिकात्मक वृक्षारोपण आंदोलन केले.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी सुंदरनगरसह शहरातील प्रमुख रस्ते ड्रेनेजसाठी उकरून ठेवलेले आहेत. मात्र ड्रेनेजचे काम अपूर्ण असल्याने रस्त्यात खड्डे व मोठ्याप्रमाणात चिखल झाला आहे. रस्त्यावर पाणी व चिखलामुळे नागरिकांना चालता सुध्दा येत नाही. रस्त्यावर साचलेले पाणी निचरा करून व काढण्याची व्यवस्था करून रस्त्यांचे मुरूमीकरण, खडीकरण करावे, अन्यथा मिरज-सांगली रस्त्यावर बेमुदत रास्ता रोको आंदोलन करू व आयुक्तांना घेराव घालण्याचा इशारा देत नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण केले.
महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे खराब रस्ते, गटारी, डासांचा उपद्रव, अस्वच्छ पाणी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसामुळे चिखलाचे साम्राज्य आहे. गटारीतील पाणी रस्त्यावर येऊन जलवाहिनीत मिसळल्याने साथींचे रोग पसरत आहेत. महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रमोद इनामदार यांनी केली. बाबासाहेब विजापुरे, दशरथ पाटील, अॅड. अरूण चंद, बी. जी. चव्हाण, आरिफ कापशीकर, मुसा जमादार उपस्थित होते.