लग्नपत्रिकेच्या कागदात बियांचे रोपण : पत्रिकेचा लगदा करून वृक्षारोपण करण्याचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 11:48 PM2018-05-10T23:48:20+5:302018-05-10T23:48:20+5:30
मानाजी धुमाळ ।
रेठरेधरण : तुळस व फुलांच्या बियामिश्रित कागदापासून रोपांच्या निर्मितीची अफलातून कल्पना प्रा. तेजस व प्रा. काजल या उच्चशिक्षित नवदाम्पत्याने समाजासमोर ठेवली आहे. स्वत:च्या लग्नपत्रिकेसाठी वापरण्यात आलेल्या कागदामध्ये तुळस व इतर फुलांच्या बिया रुजविण्यात आल्या आहेत. यातून त्यांनी ‘सेव्ह पेपर सेव्ह ट्री’ असा संदेश दिला आहे. त्यांच्या या पत्रिकेतील बीजाला अंकुर फुटून तुळस व फूलझाडांना हिरवीगार पालवी फुटणार आहे.
महे (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील रहिवासी असलेले तेजस शंकर कांबळे यांचे शिक्षण एम. टेक्. झाले आहे, तर त्यांची नियोजित पत्नी काजल यांचे शिक्षण एम.एस्सी.पर्यंत झाले आहे. तेजस इस्लामपूरच्या आरआयटी. महाविद्यालयामध्ये, तर काजल न्यू लॉ कॉलेज (कोल्हापूर) येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या दोघांचा विवाह रविवार दि. १३ मे रोजी होत आहे. या दोन विद्याविभूषित वधू-वरांच्या निसर्ग वाचविण्याच्या संकल्पनेतून ही बीजारोपण करणारी लग्नपत्रिका आकारास आली आहे.
समाजाला चांगला संदेश देण्याच्या उद्देशाने तेजस यांनी पुणे येथे संपर्क साधून कापूस, तुळस व फुलांच्या बियांचे मिश्रण करून हाताने बनविलेला कागद औरंगाबाद येथून मागविला व ही लग्नपत्रिका कोल्हापूर येथे छापून घेतली.
या पत्रिकेचा आकार १९ सेंटीमीटर आहे. लग्नानंतर निमंत्रण पत्रिकेचा कागद पाण्यात दोन दिवस भिजवून त्या कागदाचा लगदा माती टाकलेल्या कुंडीमध्ये घालावयाचा आहे. त्यास थोडे थोडे पाणी दिल्यानंतर त्या कुंडीमधून तुळस व फुलांचे रोपटे उगवणार आहे. पाच महिन्यात त्याचे झाडात रूपांतर होणार आहे. याबाबतची सर्व माहिती लग्नपत्रिकेत चित्रासह रेखाटली असून यामधून ‘पेपर वाचवा निसर्ग वाचवा’ हा संदेश मिळत आहे.
निसर्ग वाढीचा हेतू
विद्यार्थ्यांना शिक्षणातून ज्ञानाचे धडे देणाऱ्या तेजस व काजल यांची, लग्नपत्रिकेच्या कागदापासून निसर्गाची वाढ करण्याच्या हेतूने बीजांच्या निर्मितीची संकल्पना समाजाला नवीन दिशा दाखविणारी ठरत आहे.