सांगली जिल्ह्यात आठवडाभरात प्लाझ्मा थेरपी सुरू होणार : अभिजित चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 04:42 PM2020-06-01T16:42:55+5:302020-06-01T16:44:32+5:30
प्लाझ्मा उपचार पध्दतीसाठी लागणारी सर्व ती साधनसाम्रगी मिरज येथील कोविड रूग्णालयात उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आठवडाभरात या उपचारपध्दतीचा अवलंब होण्यास अडचण नाही. या उपचारपध्दतीमध्ये कोरोना मुक्त झालेल्या रूग्णाची आवश्यकता असल्याने प्रशासनातर्फे त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे.
सांगली : वाढतच चाललेल्या कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी व बाधित रूग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार कोरोनाबाधितांवर प्लाझ्मा उपचार पध्दतीचा अवलंब करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरील परवानगी घेण्याची प्रक्रीया सुरू आहे. ती अंतिम टप्प्यात असून आठवडाभरात जिल्ह्यात प्लाझ्मा उपचारपध्दतीने कोरोनाबाधितांवर उपचार सुरू होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सोमवारी दिली.
कोरोना उपाययोजनांसंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, कोरोनाचे निदान झालेल्या रूग्णांवर अत्याधुनिक पध्दतीने उपचार करण्याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार कोरोनातून पूर्णपणे बरा झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा हा घटक संकलीत करून त्याचा वापर करून बाधित रूग्णांवर उपचार केले जाणार आहेत. कोरोनामुळे अस्तवस्थ बनलेल्या रूग्णांवर हा उपचार अधिक प्रभावी ठरणार असल्याने त्यासाठी लागणार्या परवानगीची प्रक्रीया सुरू करण्यात आली होती. आरोग्य विभागाच्यावतीने याबाबत काम सुरू केले असून येत्या चार ते पाच दिवसात परवानगी व इतर प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात उपचार सुरू होणार आहेत.
प्लाझ्मा उपचार पध्दतीसाठी लागणारी सर्व ती साधनसाम्रगी मिरज येथील कोविड रूग्णालयात उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आठवडाभरात या उपचारपध्दतीचा अवलंब होण्यास अडचण नाही. या उपचारपध्दतीमध्ये कोरोना मुक्त झालेल्या रूग्णाची आवश्यकता असल्याने प्रशासनातर्फे त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे.
जिल्ह्याबाहेरून आलेल्या व्यक्तीच कोरोनाबाधित आढळून येत असल्याने आता बाहेरून येणार्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे क्वारंटाईनमध्ये असलेले व प्रवासाचा इतिहास असलेल्या व्यक्तीची तपासणी तातडीने घेण्यात येत आहे.
जिल्ह्यातील साळशिंगे येथील अहमदाबाद वगळता इतर सर्वजण बाधित मुंबईहूनच आलेले असल्याने मुंबई,पुणे येथून येणार्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकार्यांनी सांगितले.
काय आहे प्लाझ्मा थेरपी?
कोणत्याही आजारात चिंताजनक प्रकृती असलेल्या अथवा व्हेंटीलेटरवर असलेल्या रूग्णावर याचा उपयोग केला जातो. कोरोनाबाबतही प्लाझ्मा थेरपीचा वापराबाबत संशोधन झाले आहे. यात कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा घेऊन त्याचा इतर रूग्णांवर केला जातो. पहिल्या रूग्णांमध्ये तयार होणार्या प्रतीजैवकांमुळे दुसर्या रूग्णातील संसर्ग कमी होण्याची शक्यता असल्याने प्लाझ्मा उपचारपध्दती कोरोना रूग्णांवर प्रभावी ठरू शकत असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.