सांगलीत जिल्हा परिषदेत पोषण आहारातून आणला प्लास्टिकचा साप, दलित महासंघाचे आंदोलन
By संतोष भिसे | Published: July 5, 2024 05:09 PM2024-07-05T17:09:55+5:302024-07-05T17:10:16+5:30
पलूसमध्ये अंगणवाडीतील आहारात साप सापडल्याचा निषेध
सांगली : पलूस येथे अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात मृत साप सापडल्याच्या निषेधार्थ दलित महासंघाने शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर घोषणाबाजी केली. पुरवठादार संस्थेची चौकशी करुन ठेका रद्द करावा आणि संबंधित अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी केली.
महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या प्रवेशदारात आंदोलन झाले. आंदोलकांनी पोषण आहाराचे धान्य आणि त्यामध्ये प्लास्टिकचा साप आणला होता. पोलिसांनी आंदोलकांना प्रवेशदारातच अडविले. एकात्मिक बालविकास प्रकल्प योजनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत निवेदन स्वीकारले.
महासंघाने निवेदनात म्हटले आहे की, पलूस येथे कृषिनगर अंगणवाडीत पोषण आहारात मृत साप सापडणे ही गंभीर बाब आहे. बालकांच्या आरोग्याविषयी शासन किती बेफिकिर आहे हे यातून स्पष्ट होते. इतकी गंभीर घटना घडूनही अधिकारी कारवाईच्या मनस्थितीत दिसत नाहीत. त्यामुळे शासनाने स्वतंत्र चौकशी समितीद्वारे सखोल चौकशी करावी. पुरवठादाराचा ठेका रद्द करावा. या घटनेकडे दुर्लक्ष करुन बालकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ करावे.
आंदोलनात राज्याध्यक्ष टिपू पटवेगार, राज्य संपर्क प्रमुख गणेश वाईकर, महिला अध्यक्षा वनिता कांबळे, सनाऊला बावचकर, जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सलीम मुल्ला, तात्यासाहेब देवकुळे, महेश देवकुळे, सचिन मोरे आदी सहभागी झाले.