रंगीबेरंगी फुलानी शित्तूर-उदगिरीचे पठार बहरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:26 AM2021-09-13T04:26:00+5:302021-09-13T04:26:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वारणावती : निसर्ग सौंदर्याने मुक्तहस्ते उधळण केलेल्या शाहुवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील शित्तूर-वारूण ते उदगिरीदरम्यानचे पठार (सडा) ...

The plateau of Shittur-Udgiri blossomed with colorful flowers | रंगीबेरंगी फुलानी शित्तूर-उदगिरीचे पठार बहरले

रंगीबेरंगी फुलानी शित्तूर-उदगिरीचे पठार बहरले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

वारणावती : निसर्ग सौंदर्याने मुक्तहस्ते उधळण केलेल्या शाहुवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील शित्तूर-वारूण ते उदगिरीदरम्यानचे पठार (सडा) विविध जातीच्या वेलीफुलांनी बहरले आहे. त्यामुळे पर्यटकांना मनमुराद आनंद घेण्याची पर्वणीच निर्माण झाली आहे. साताराच्या कास पठारसारखे शित्तूर-उदगिरीचे पठार पर्यटकांना खुणावत आहे.

शिराळा पश्चिम विभाग व शाहुवाडीचा उत्तर विभाग निसर्ग सौंदर्याने नटला आहे. सदाहरित असणाऱ्या या भागात पावसाळ्यात हिरवीगार वनराई, विविध जातींचे वृक्ष, वेली, औषधी वनस्पती, फळे, फुले, फुलपांखरे, पक्षी, प्राणी यांचे पर्यटकांना आकर्षण असते. शिराळा तालुक्यातील गुढे-पाचगणीचे पठार, अभयारण्यातील झोळंबीचे पठार व शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर, उदगिरीचे पठार विविध रंगांच्या व जातींच्या फुलांनी बहरलेले असते. या पठारावर सध्या सीतेची आसवे, नीलिमा, लाल गालीचा, जांभळी मंजिरी, पांढरे शुभ्र गेंद, दीपकाडी व निळ्याशार आभाळी फुले, धनगरी फेटा, आदी फुले फुललेली आहेत. विविध रंगी फुलांनी पठार सजले आहे. हे पठार आता ‘मिनी कास पठार’ ठरू पाहत आहे.

आरळा ( ता. शिराळा) येथे वारणा नदीच्या पलीकडून शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर-वारुण-राघुवाडा ते उदगिरी या मार्गावर रस्त्यालगतच हे पठार आहे. आरळा ते उदगिरी सडा हा अंदाजे दहा किलोमीटरच्या नागमोडी वळणाच्या मार्गावर निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. पठारावर प्रवेश करण्याअगोदर सड्यापासून दोनशे ते तीनशे फुट अंतरापर्यंत पसरलेल्या विविध वनस्पती व गवताचे गालीचे पर्यटकांना खुणावत आहेत. पठारावर प्रवेश करताच थंडगार अंगाला झोंबणारा गार वारा, कातळावर उमललेली सीतेची आसवे, नीलिमा तसेच विविध फुले पर्यटकांना एक पर्वणीच ठरत आहेत. दुपारनंतर पठारावर दाट धुक्यांची झालर पर्यटकांना मोहित करून टाकत आहे. कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून पर्यटकांवाचून सुने-सुने असलेल्या या भागात सध्या मनमोहक दृश्य पर्यटकांना साद घालत आहेत.

फाेटो : १२ वारणावती १

ओळ : मिनी कास पठार समजल्या जाणाऱ्या शित्तूर, उदगिरी पठारावर फुललेली रंगीबेरंगी फुले.

(छाया -गंगाराम पाटील)

120921\screenshot_20210912-172510_whatsapp.jpg

शित्तूर उदगिरी पठारावर फुललेली रंगीबेरंगी फुले.(छाया -गंगाराम पाटील)

Web Title: The plateau of Shittur-Udgiri blossomed with colorful flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.