नवसाहित्यिकांच्या प्रतिभेला साहित्य संमेलनांतून व्यासपीठ
By admin | Published: October 25, 2016 11:49 PM2016-10-25T23:49:07+5:302016-10-26T00:09:14+5:30
भारती पाटील : तासगाव येथे कोजागरी साहित्य संमेलन
तासगाव : शहरात नवकवींसाठी ‘कोजागरी साहित्य संमेलन’ हे नवोदित कवींच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे आहे. या प्रकारची साहित्यसंमेलने अखंडपणे चालू ठेवणे ही काळाची गरज असल्याचे मत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. भारती पाटील यांनी केले.
जीवन विकास संस्थेच्या कलासाधक शाखेच्यावतीने दहावे कविसंमेलन तासगावात पार पडले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ कवी मा. प्रा. भीमराव धुळूबुळू व जीवन विकास संस्थेचे सचिव के. वाय. कोळेकर उपस्थित होते. के. वाय. कोळेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. भीमराव धुळूबुळू यांनी वाचन संस्कृतीविषयी माहिती सांगितली. सध्या टीव्ही, सोशल नेटवर्किंगयाचे वर्चस्व वाढले असून, त्यामध्ये माणूस मागे पडल्याचे सांगितले.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबूराव गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध विषयांवर कविता सादर करण्यात आल्या.
भाग्यश्री सावंत यांनी ‘झेप’ या कवितेत स्त्रीचे कर्तृत्व सांगितले. निमंत्रितांमध्ये महाराष्ट्ररत्न वि. स. पागे विद्यानिकेतन कृषी माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एस. एच. जमादार यांनी शालेय जीवनातील कविता सादर केल्या. डॉ. भारती पाटील यांनी ‘सांगता येत नाही आणि सहन होत नाही’ या सत्य स्थितीवर काव्यातून प्रकाश टाकला.
या सोहळ्यासाठी जीवन विकास संस्थेचे सचिव के. वाय. कोळेकर, कोषाध्यक्ष एल. डी. म्हेत्रे, मा. तु. पां. माळी, कमल कोळेकर उपस्थित होते. विनया कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. (वार्ताहर)