सांगली जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ..! : ४३० वाहनेच अधिकृत-वाहतुकीचा बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 11:10 PM2018-06-28T23:10:56+5:302018-06-28T23:13:14+5:30
सांगली : शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या नावाखाली वाहनधारक विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळत आहेत. तीस-चाळीस हजाराची एखादी व्हॅन घेऊन विद्यार्थी वाहतुकीचा बाजार मांडला आहे.
सचिन लाड ।
सांगली : शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या नावाखाली वाहनधारक विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळत आहेत. तीस-चाळीस हजाराची एखादी व्हॅन घेऊन विद्यार्थी वाहतुकीचा बाजार मांडला आहे. शहरासह ग्रामीण भागातही बेकायदा विद्यार्थी वाहतुकीचा हा बाजार वाढला आहे. आरटीओ व वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे कारवाईची मोहीम उघडल्याने गुरुवारी बेकायदा विद्यार्थी वाहतूक करणारी रिक्षा, व्हॅनसारखी वाहने गायब झाली. त्यामुळे मुलांना शाळेत सोडण्यास पालकांनाच जावे लागले.
सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात खासगी शाळांची संख्या वाढली आहे. खासगी शाळेत प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. प्रत्येक शाळांची वेळ वेगवेगळी आहे. विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यास पालकांना वेळ मिळत नसल्याने ते रिक्षा अथवा व्हॅनचा मार्ग अवलंबतात. त्यामुळे विद्यार्थी वाहतुकीच्या वाहनांची संख्याही वाढत गेली आहे. दररोज तासभर काम करुन महिन्याकाठी पंधरा ते वीस हजार रुपये मिळू लागल्याने, अनेकांनी विद्यार्थी वाहतुकीचा हा व्यवसाय सुरु केला. पण हा व्यवसाय करताना शासनाने जी नियमावली केली आहे, त्याचे कुठेही पालन होताना दिसत नाही. निव्वळ पैसे मिळविण्यासाठी कोंबड्या भरल्यासारखे विद्यार्थ्यांना रिक्षा, व्हॅनमध्ये कोंबून त्यांच्या जीविताशी खेळ सुरू आहे. याला आळा घालण्यासाठीच आरटीओ व वाहतूक पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई सुरु केली आहे.
४३०वाहने अधिकृत
जिल्ह्यात विद्यार्थी वाहतूक करणारी अधिकृत ४३० वाहने आहेत. त्यांची आरटीओ कार्यालयात नोंद आहे. यामध्ये स्कूल बस, व्हॅन व एसटी महामंडळाच्या बसेसचा समावेश आहे. रिक्षाला विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नाही. तसेच ते शासनाच्या नियमातही बसत नाहीत. तरीही ते खुलेआम विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. १९९ शाळांच्या त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या बसेस आहेत.
कडक नियमावली
विद्यार्थी वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या वाहनांसाठी कडक नियमावली आहे. परवाना देतानाच त्यामध्ये ‘विद्यार्थी वाहतूक’ असा उल्लेख असतो. बससाठी ४० विद्यार्थी, तर व्हॅनसाठी आठ ते नऊ विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. विद्यार्थी वाहतुकीच्या वाहनास पिवळा रंग असतो. वाहनाच्या मागे व पुढे ‘स्कूल बस’ असा उल्लेख पाहिजे. पण सध्या अधिकृत वाहनांपेक्षा बेकायदेशीर व्हॅन व रिक्षांमधूनच मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वाहतूक सुरु असल्याचे दिसून येते.
विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात
अधिकृत व्हॅन चालकांनी त्यांचे लायसन्स, बॅज-बिल्ला जवळ बाळगला पाहिजे. सांगलीत दोन वर्षापूर्वी एका बेकायदा विद्यार्थी वाहतूक करणाºया व्हॅनला अपघात झाला होता. त्यामध्ये सहा मुले जखमी झाली होती. तसेच शंभरफुटी रस्त्यावर एका व्हॅनने त्यात मुले नसताना पेट घेतला होता. येळावी (ता. तासगाव) येथे एका व्हॅन चालकाने विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन केले होते. सातत्याने या घटना घडल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा बनला आहे.
असे आहेत स्कूल बसचे नियम...
स्कूल बसचा चालक निर्व्यसनी असावा.
चालकाने गणवेशामध्येच असावे, लायसन्स व बॅज-बिल्ला बाळगला पाहिजे.
बसमध्ये मुली असतील तर महिला कर्मचाºयाची नियुक्ती असावी.
बसमध्ये मुले असतील तर पुरुष कर्मचारी हवा.
बसला दोन्ही बाजूला आरसे व दरवाजे हवेत.
बसच्या प्रत्येक सीटच्या खिडकीला लोखंडी सळई बसविलेली असावी.
स्कूल बसप्रमाणे अधिकृत व्हॅनला हे कडक नियम नाहीत.
विद्यार्थी वाहतूक करण्यास आमचा विरोध नाही. पण वाहनधारकांनी रितसर परवाना घेऊन हा व्यवसाय करावा. नियमांचे काटेकोर पालन करावे. अन्यथा आमची कारवाई सुरूच राहील. पालकांनी त्यांच्या मुलांना अधिकृत वाहनामधूनच शाळेत पाठवावे.
- अतुल निकम, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, सांगली.