महापौरांच्या अर्ज वैधतेबाबत हायकोर्टात याचिका तीन अपत्यांबाबत आक्षेप : छाननीवेळी उमेदवारी ठरली होती वैध- सांगली महापालिका निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 09:45 PM2018-07-13T21:45:05+5:302018-07-13T21:45:38+5:30
महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार महापौर हारुण शिकलगार यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैध ठरविल्यानंतर शुक्रवारी तक्रारदार आसिफ बावा यांनी मुंबई उच्च न्यायालयात
सांगली : महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार महापौर हारुण शिकलगार यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैध ठरविल्यानंतर शुक्रवारी तक्रारदार आसिफ बावा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांची तीन अपत्यांबाबतची तक्रार फेटाळण्यात आली होती. दुसरीकडे मिरजेत माजी महापौर विवेक कांबळे, संगीता खोत, गणेश माळी या भाजपच्या तिघांविरोधातील हरकत फेटाळण्यात आली. याविरोधात काँग्रेस व राष्ट्रवादीने न्यायालयात धाव घेतली आहे. उमेदवारी अर्जावरून आता कोर्टबाजी सुरू झाली आहे.
महापालिकेच्या प्रभाग १६ मधून महापौर शिकलगार यांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी दिली आहे. गुरुवारी अर्ज छाननीवेळी शिकलगार यांच्या अर्जाला बावा यांनी आक्षेप घेतला. शिकलगार यांना तिसरे अपत्य असल्याचे पुरावे गोळा केले होते. वसंतदादा शासकीय रुग्णालयाकडून त्यांच्या नावे मुलीचा जन्म झाल्याची महापालिकेकडे नोंद झाल्याचा दावा करीत कागदपत्रे सादर केली.
महापालिकेत मुलीऐवजी मुलगा असे नाव जन्म-मृत्यू कार्यालयात नोंद झाल्याचे लक्षात आल्यानंतर २००९ मध्ये त्यामध्ये दुरुस्ती करून मुलगी असे करण्यात आल्याचा दावाही बावा यांनी केला. त्यानंतर पुन्हा २०१७ मध्ये हे प्रकरण अंगलट येत असल्याने शिकलगार यांनी महापौर पदाच्या अधिकाराचा गैरवापर करीत त्यात दुरुस्ती करून स्वत:चे नाव काढल्याचाही आरोप केला.
यामुळे त्यांचा अर्ज अपात्र ठरवावा, अशी मागणी केली होती. यावेळी शिकलगार यांच्याबाजूने अॅड. राजू नरवाडकर आणि अॅड. मुमताज जमादार यांनी बाजू मांडली. त्यांनी शिकलगार यांच्या अर्जावर घेतलेले आक्षेप फेटाळून लावले. बावा यांनी दिलेले पुरावे खोटे असल्याचा दावा केला. ज्या अपत्याबाबत बावा यांनी दावा केला आहे, त्याच्याशी आणि संबंधित महिलेशी शिकलगार यांचा काहीच संबंध नसल्याचा दावा करीत त्याचे पुरावे सादर केले.
अखेर निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेऊन महापौरांचा अर्ज वैध ठरविला होता. यामुळे महापौरांना दिलासा मिळाला होता. शुक्रवारी बावा यांनी निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती ओक व न्यायमूर्ती छागला यांच्या खंडपीठासमोर दावा दाखल केला. यात निवडणूक अधिकाºयांच्या निकालाला आव्हान देण्यात आले आहे. यावर आता सोमवारी सुनावणी होणार असून न्यायालयाने संबंधितांना नोटिसाही बजाविल्याचे बावा यांनी सांगितले.
कांबळे, खोत, माळींचे अर्ज वैध
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांच्या छाननीत भाजपचे विवेक कांबळे, संगीता खोत, गणेश माळी यांच्या उमेदवारीला घेतलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकाºयांनी फेटाळून लावली. निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या या निर्णयाविरोधात राष्टÑवादी व काँग्रेसच्या उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रभाग सातमधील भाजप उमेदवार संगीता खोत या मजूर सोसायटीच्या संचालक, ठेकेदार असल्याची व भाजप उमेदवार गणेश माळी महापालिकेचे ठेकेदार असल्याची व प्रभाग वीसमध्ये भाजपचे उमेदवार विवेक कांबळे यांनी अतिक्रमण केल्याच्या हरकतीवर गुरूवारी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील यांनी शुक्रवारी दुपारी यावर निर्णय दिला. हरकती घेतलेल्या भाजपच्या तीनही उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले.