तानंग पाणी योजनेसाठी पर्याय द्या
By admin | Published: July 19, 2015 11:08 PM2015-07-19T23:08:50+5:302015-07-20T00:04:43+5:30
कानडवाडी ग्रामसभेत ठराव : एमआयडीसीकडे पाण्याची मागणी करण्याचा निर्णय
कुपवाड : तानंगसह इतर सात गावांची नळपाणी पुरवठा योजना पुढील महिन्याच्या प्रारंभापासून बंद करण्याची नोटीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून देण्यात आल्यानंतर, औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी घेण्याविषयी प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय रविवारी कानडवाडी ग्रामसभेत घेण्यात आला. त्यामुळे पर्यायी व्यवस्था होईपर्यंत जीवन प्राधिकरण विभागाने ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कोणत्याही परिस्थितीत बंद करू नये, असा ठरावही ग्रामस्थांनी केला आहे.
तानंगसह इतर सात गावांची नळपाणी पुरवठा योजना ३ आॅगस्टपासून बंद करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी कानडवाडी (ता. मिरज) येथील ग्रामसभेत पर्यायी व्यवस्थेवर विचार करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. सभेस कानडवाडीचे नेते अनिल शेगुणसे, भालचंद्र खोत गुरुजी, सरपंच रुक्साना मुजावर, उपसरपंच शीतल भोरे प्रमुख उपस्थित होते.
अनिल शेगुणसे यावेळी म्हणाले की, कुपवाड एमआयडीसीमधील केमिकलमिश्रित सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यामुळे कानडवाडीतील कूपनलिका आणि विहिरींचे पाणी खराब झाले. हे पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ हे तानंगसह इतर सात गावांच्या पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून होते. ही योजनाच आता तोट्याचे कारण दाखवून पुढील महिन्याच्या प्रारंभापासून बंद करण्यात येणार आहे. त्याचा सर्वात मोठा फटका प्रामाणिकपणे पाणी बिले भरणाऱ्या कानडवाडीकरांना बसणार आहे. त्यामुळे आम्ही कदापीही पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था होईपर्यंत योजना बंद होऊ देणार नाही. त्यासाठी प्रसंगी तीव्र आंदोलनही उभे करू.
खोत गुरुजींनीही जीवन प्राधिकरण विभागाच्या अनागोंदी कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेकडून आधीच अनियमित पाणीपुरवठा केला जात होता. त्यांनी स्वत:हूनच पाणी पुरवठा बंद करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आम्ही आता एमआयडीसीकडून पाणी घेऊ. त्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधींना भेटणार आहोत. पर्यायी व्यवस्थेबाबतचा ठरावही ग्रामसभेत केला असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामसभेस कानडवाडी विकास सोसायटीचे अध्यक्ष शिवगोंडा कोथळे, उपाध्यक्ष अनुप खोत, सावळीचे श्रीकांत डोंगरे, कुबेर गणे, श्रीकांत भोरे, शुभांगी कर्वे, वर्षा वाळवेकर, बाळासाहेब खोत, मिलिंद खोत, प्रदीप खोत, संजय खोत, विद्याधर चौगुले, तानंगचे सरपंच पोपट राजमाने, काका भोरे, ब्रह्मनाथ खोत, सुनीता खोत, कुमार कर्वे, तसेच ग्रामस्थ आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
उद्योगमंत्र्यांची भेट घेणार...
तानंगसह सात गावांची पाणी योजना बंद झाल्यानंतर कानडवाडीतील ग्रामस्थांचे हाल होणार आहेत. त्यातच येथील पाणीही एमआयडीसीमुळे खराब झाले आहे. त्यामुळे पिण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाकडून अल्पशा दरात पाणी घेण्याशिवाय आम्हाला दुसरा कोणताही पर्याय नाही. हे पाणी घेण्यासाठी आमचे नेते माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना लेखी निवेदन देणार आहोत. तसेच पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासमवेत सांगलीतील औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत.