श्रीकृपा कोल्ड स्टोरेजच्या आगीची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:17 AM2021-07-23T04:17:30+5:302021-07-23T04:17:30+5:30
तासगाव : तालुक्यातील श्रीकृपा कोल्ड स्टोरेजला लागलेल्या आगीतून संशयाचा धूर येत आहे. बेदाणा व्यवसायात तोटा झाला की स्टोरेज जाणीवपूर्वक ...
तासगाव : तालुक्यातील श्रीकृपा कोल्ड स्टोरेजला लागलेल्या आगीतून संशयाचा धूर येत आहे. बेदाणा व्यवसायात तोटा झाला की स्टोरेज जाणीवपूर्वक पेटवून इन्शुरन्स कंपनीकडून पैसे उकळण्याचा प्रकार आहे. यामुळे स्टोरेज मालक मालामाल होत असून, बेदाणा जळालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे. या सर्व प्रकारची चौकशी होऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी शिवसेना माजी तालुकाध्यक्ष अमोल काळे यांनी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याकडे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ८ जून रोजी तासगाव-सांगली रोडवरील श्रीकृपा कोल्ड स्टोरेजला आग लागली. ही आग शंकास्पद असल्याचे वाटते. यापूर्वीही तालुक्यातील अनेक कोल्ड स्टोरेजना आग लागली होती. त्यामध्ये ओम कोल्ड स्टोरेज, चंद्रसेन कोल्ड स्टोरेज, सिद्धनाथ कोल्ड स्टोरेज, दास कोल्ड स्टोरेज व आता श्रीकृपा कोल्ड स्टोरेज, या कोल्ड स्टोरेजचा समावेश आहे. स्टोरेज मालकांचा बेदाणा व्यवसायातील आर्थिक तोटा झाला की अशा घटना घडविल्या जातात व इन्शुरन्स कंपनीकडून झालेल्या नुकसानीचा क्लेम करून इन्शुरन्स कंपनीकडून भरमसाट नुकसानभरपाई मिळविली जाते व कोल्ड स्टोरेज मालक स्वतःचा आर्थिक फायदा बघतात. मात्र शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा ते विचारही करीत नाहीत. तरी श्रीकृपा कोल्ड स्टोरेजच्या आगीची चौकशी होईपर्यत इन्शुरन्स क्लेम थांबवावा व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी करून तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.