भंडारेलाही ठार मारण्याचा होता कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:08 AM2017-11-13T00:08:10+5:302017-11-13T00:09:27+5:30

The plot to kill Bhandare was also cut | भंडारेलाही ठार मारण्याचा होता कट

भंडारेलाही ठार मारण्याचा होता कट

Next


सांगली : अनिकेत कोथळे याच्या खुनाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अमोल भंडारे यालाही ठार मारण्याचा कट निलंबित पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेने रचला होता, अशी धक्कादायक माहिती सीआयडीच्या तपासातून उजेडात आली आहे. अरुण टोणेने रोखल्याने कामटे गप्प बसला, अशी माहितीही पुढे आली आहे.
कवलापूर (ता. मिरज) येथील संतोष गायकवाड यांना लुबाडल्याप्रकरणी अनिकेत कोथळे व अमोल भंडारे यांना अटक केली होती. दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. पहिल्याच दिवशी अनिकेत व अमोलला चौकशीसाठी कोठडीतून बाहेर काढले. कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसिरुद्दीन मुल्ला, झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले या सर्वांनी दोघांना बेदम मारहाण केली. अनिकेतला उलटा टांगून ‘थर्ड डिग्री’चा वापर केला. यात त्याचा मृत्यू झाला. आता आपल्या सर्वांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल होणार, अशी त्यांना भीती वाटू लागली. अनिकेतचा मृत्यू भंडारेच्या डोळ्यासमोर झाला होता. आता कामटेचे पथक आपल्यालाही मारून टाकणार, या भीतीने भंडारे गर्भगळीत झाला होता.
कामटेची नजर भंडारेवर पडली. त्यालाही मारून टाकण्याचे कामटेने बोलून दाखविले. ‘भंडारेला सोडले तर आपण सर्वजण अडकू शकतो’, असे कामटे म्हणाला; पण अरुण टोणेने त्याला विरोध केला. आधीच अनिकेतचे प्रकरण अंगलट आले आहे, यातून बाहेर पडायला पाहिजे; त्याला मारुन आणखी गोत्यात येऊ शकतो’, असे त्याने सांगितले. त्यामुळे कामटे गप्प बसला. त्यानंतर कामटेने ‘डीबी’ रुममध्येच भंडारेला, ‘हा प्रकार जर कोणाला सांगितलास तर तुलाही मारुन टाकेन’, अशी धमकी दिली. भंडारे भीतीने हात जोडून ‘नाही साहेब’ असे म्हणाला, अशी माहिती सीआयडीच्या चौकशीतून पुढे आली आहे. त्यामुळे सीआयडीचे पथक न्यायालयीन कोठडीत असलेल्या भंडारेला चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
भंडारेच्या जिवात जीव नव्हता
अनिकेत मरण पावल्यानंतर भंडारे घाबरुन गेला. त्यात कामटेने त्यालाही मारण्याची धमकी दिली होती. भंडारेला कोठडीत ठेवले तर अवघड होईल, असा विचार करुन कामटेच्या पथकाने त्यालाही सोबत घेऊन आंबोली (जि. सिंधुदुर्ग) गाठले. तिथे जाईपर्यंत, मृतदेह जाळून परत सांगलीत येईपर्यंत भंडारेच्या जिवात जीव नव्हता. कामटे आपल्यालाही मारुन टाकेल काय? अशी भीती त्याच्या मनात होती. घटनेनंतर तब्बल २० ते २२ तास तो मृत्यूच्या दाढेत होता.

कामटेसह सहाजण स्वतंत्र कोठडीत
युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांना शहरातील विविध पोलिस ठाण्यातील पोलिस कोडठीत स्वतंत्रपणे ठेवण्यात आले आहे. सीआयडीकडून या सर्वांची चौकशीही स्वतंत्रपणे केली जात आहे. सीआयडीचे अप्पर पोलिस महासंचालक संजयकुमार वर्मा यांनी शनिवारी दिवसभर स्वत: सर्वांची कसून चौकशी केली. रात्री उशिरा ते मुंबईला रवाना झाले.

आम्हाला संरक्षण द्या : भंडारेच्या आईची मागणी
कवलापूरच्या अभियंत्यास लुबाडल्याप्रकरणी अनिकेतसोबत अमोल भंडारे यालाही अटक केली होती. भंडारेसमोरच अनिकेतचा खून झाला आहे. भंडारे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आज ना उद्या तो जामिनावर बाहेर येईल. माझ्या मुलास तसेच मला व माझ्या दिरास अटकेत असलेल्या कामटेसह अन्य आरोपींच्या नातेवाईकांकडून धोका असून, आम्हाला पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी भंडारेची आई रेखा यांनी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. माझ्या मुलास आता कोणी नोकरी देणार नाही. त्यामुळे त्याला सरकारी नोकरी द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

कोथळे कुटुंबीयांचा आत्मदहनाचा इशारा
सांगली : अनिकेतच्या खून प्रकरणात आम्ही केलेल्या मागण्या मान्य न केल्यास कुटुंबासह आत्मदहन केले जाईल, असा इशारा अनिकेतच्या कुटुंबाने रविवारी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना दिला. पोलीस कोठडीत खून झालेल्या अनिकेत कोथळे याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी केसरकर रविवारी सायंकाळी सांगलीत दाखल झाले. त्यांनी या कुटुंबाच्या घरी भेट दिली. यादरम्यान नातेवाइकांनी पोलिसांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

Web Title: The plot to kill Bhandare was also cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा