दराच्या षड्यंत्राने द्राक्ष हंगाम कडवट

By admin | Published: March 9, 2017 11:21 PM2017-03-09T23:21:36+5:302017-03-09T23:21:36+5:30

उत्पादकांना चिंता : अनुकूल वातावरण असूनही तासगाव तालुक्यात दलाल, व्यापाऱ्यांमुळे फटका

The plot of the plot is grapefruit season | दराच्या षड्यंत्राने द्राक्ष हंगाम कडवट

दराच्या षड्यंत्राने द्राक्ष हंगाम कडवट

Next


प्रदीप पोतदार ल्ल कवठेएकंद
यंदा तासगाव तालुक्यातील द्राक्षपट्ट्यातील शेतकऱ्यांना हवामानाने तारले आहे. त्यामुळे यंदा द्राक्षांचा गोडवा अधिक वाढला आहे. गतवेळच्या तुलनेत औषध फवारणी कमी प्रमाणात करावी लागली आहे. पोषक हवामानामुळे द्राक्ष उत्पादनात वाढ झाली आहे. परंतु एकाचवेळी बहुतांशी द्राक्षमाल काढणीला आला असल्याने द्राक्ष दलाल व व्यापारी मंडळींकडून होणाऱ्या दराच्या षड्यंत्रामुळे आर्थिक नुकसान होऊन शेतकऱ्यांची वाताहत झाली आहे. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता, येत्या पंधरवड्यात द्राक्षदर सुधारण्याची शक्यता आहे.
बदलते हवामान, द्राक्ष दराची जाणीवपूर्वक घसरण अशा नैसर्गिक व कृत्रिम समस्यांचा मुकाबला शेतकऱ्यांना करावा लागत आहे. गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा मात्र हवामानाची पोषक साथ लाभल्याने औषध फवारणीच्या खर्चात बचत झाली आहे. तसेच पोषक वातावरणामुळे द्राक्ष उत्पादनातही वाढ झाली आहे. सध्या थंडी संपून उन्हाचा पारा चढू लागल्याने बाजारात द्राक्षांना मागणी वाढतच आहे. किरकोळ विक्रेते, दलाल यांच्याकडे स्थानिक ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे. त्यामुळे द्राक्षांची गोडी वाढत आहे. पण प्रत्यक्षात उत्पादक शेतकऱ्यांना मात्र अपेक्षित दर मिळत नाही.
सध्या १२० ते २२०-२६० रूपये प्रति चार किलोस दर मिळत आहे. एकाचवेळी छाटणी घेतलेल्या बागांमधील द्राक्षे काढणीला आली असल्याने दराची कृत्रिम घसरण झाली आहे. अशामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीकडे कल ठेवला आहे. चोरोची, ढालगाव पट्ट्यातील बेदाणा रॅकवर द्राक्षमाल पाठवला जात आहे. द्राक्ष हंगामाच्या लगबगीमुळे तासगावतील सावळज, डोंगरसोनी, मणेराजुरी, कवठेएकंद, तसेच सोनी, मालगाव, आरग, कवलापूर भागात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे.
यंदा गोडी अधिकच...
गतवेळच्या तुलनेत यंदा हवामानाची साथ मिळाली असल्याने द्राक्षांच्या उत्पन्नात ४० टक्केपर्यंत वाढ झाली आहे, तसेच औषध फवारणीसाठीही कमी खर्च झाला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत झाली आहे. त्यामुळे द्राक्षांची गोडी अधिक असल्याचे चित्र आहे. पुढील आठवड्यासाठी द्राक्षांना मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे दर तेजीत राहून शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होणार आहे.
द्राक्षपंढरीतही हमीभावाची उणीव
तासगाव ही द्राक्षपंढरी. तरीही हमीभाव मिळत नाही. तसेच बहुतांशी शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार घडत असतात. दर पाडले जाऊन आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. शेतकऱ्यांना निसर्गाकडून आणि व्यापाऱ्यांकडूनही फसवणूक होत असते. याबाबत जागरूकता निर्माण केली पाहिजे. कृषी विभागाने तसेच प्रशासनाने पिकांच्या दराबाबत किंवा द्राक्ष व बेदाणा यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
बागायतदारांना मार्गदर्शन
द्राक्षपंढरीमध्ये बागायतदारांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध मार्गानी त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. बाजारभावाबरोबरच तिथे पाण्याचीही समस्या आहे. याबरोबरच आरफळ, म्हैसाळ, पुणदी उपसा सिंचन अशा योजना राजकीय हस्तक्षेप न करता शेतकऱ्यांच्या हितासाठी चालविणे महत्त्वाचे आहे. तरच जिगरबाज शेतकऱ्यांसाठी द्राक्षशेती संजीवनी ठरणार आहे. याबाबत दीर्घकालीन उपाययोजना व जलजागृती कार्यक्रम हाती घेऊन प्रबोधनातून टंचाई निवारणाची गरज आहे. अशाप्रकारे मार्गदर्शन झाले तरच द्राक्ष उत्पादकांना फायदेशीर ठरणार आहे.

Web Title: The plot of the plot is grapefruit season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.