Sangli: कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा, कामगाराचा मृत्यू; मिरजेच्या धान्य गोदामातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 01:00 PM2023-09-11T13:00:33+5:302023-09-11T13:15:54+5:30
उपचार सुरू असताना झाला मृत्यू
मिरज : मिरजेत धान्य दुकानाच्या गोदामात कीटकनाशक फवारणी केल्यानंतर विषबाधा होऊन सर्फराज मकबूल मुल्ला (वय २१, रा. म्हैसाळ रोड, मिरज) या कामगाराचा मृत्यू झाला. शनिवार, दि. ९ सप्टेंबर राेजी ही घटना घडली.
सर्फराज हा शनिवार पेठेत शरीफ यांच्या धान्य दुकानात कामाला होता. शरीफ यांच्या दुकानाच्या शनिवार पेठ व मार्केट यार्डातील गोदामात सर्फराज याने धान्यावर आठवडाभर कीटकनाशक फवारणी केली होती. कोणत्याही संरक्षक साधनांशिवाय कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन त्याला उलट्या, मळमळ असा त्रास सुरू झाला. चार दिवसापूर्वी त्यास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
मात्र, उपचार सुरू असताना शनिवारी सर्फराज याचा मृत्यू झाला. हाेतकरू कुटुंबातील सर्फराज बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर धान्य दुकानात कामाला लागला होता. त्याचे वडील हमाली करतात. तीन महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. सर्फराज याच्या आकस्मिक मृत्यूने मुल्ला कुटुंबीयांवर मोठा आघात झाला. मिरज शासकीय रुग्णालयात सर्फराज याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला. याबाबत शहर पोलिसांत नोंद आहे.