जिल्ह्यात विषारी दारूचे हत्याकांड टळले!

By Admin | Published: June 21, 2015 11:12 PM2015-06-21T23:12:43+5:302015-06-22T00:13:51+5:30

‘उत्पादन शुल्क’ची सतर्कता : सहा महिन्यांपूर्वीच इस्लामपूरचा कारखाना उद्ध्वस्त

The poisonous liquor massacre in the district! | जिल्ह्यात विषारी दारूचे हत्याकांड टळले!

जिल्ह्यात विषारी दारूचे हत्याकांड टळले!

googlenewsNext

सचिन लाड -सांगली -राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सहा महिन्यांपूर्वी पेठ (ता. वाळवा) येथील बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केल्याने, जिल्ह्यातील विषारी दारूचे मोठे हत्याकांड टळले होते. मुंबईत विषारी दारूने नव्वदहून अधिक जणांचा बळी गेल्याने भरारी पथकाने केलेल्या कारवाईची चांगलीच चर्चा सुरु आहे. पथकाचे निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी ही कारवाई यशस्वी करण्यासाठी तब्बल दोन महिने ‘फिल्डिंग’ लावली होती.
पेठ येथील सुधीर शेलार या पैलवान तरुणाने स्वत:च्या शेतात बनावट दारु निर्मितीचा कारखाना सुरु केला होता. कर्नाटकातील गोकाक येथे त्याने दारू तयार करण्याचे धडे घेतले होते. या कारखान्याची माहिती मिळताच रावसाहेब कोरे यांनी ‘स्टिंग आॅपरेशन’द्वारे हा कारखाना उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला होता. विभागीय आयुक्त संगीता दरेकर, अधीक्षक प्रकाश गोसावी यांनी ही कारवाई यशस्वी करण्यासाठी २० जणांचे पथक तयार केले होते. त्यानंतर शेलारच्या क्रमांकावर बोगस ग्राहक म्हणून पथकाने संपर्क साधून, दारू पाहिजे, असे सांगितले.
यावर शेलारने, ‘दारू मिळेल; पण प्रथम अनामत रक्कम बँक खात्यावर भरावी लागेल’, असे सांगितले. तसेच त्याने ‘तुम्ही कोण, काय करता, माझे नाव कोणी सांगितले, येथे दारु मिळते हे तुम्हाला कसे कळाले’, अशा अनेक प्रश्नांचा भडीमार केला; मात्र पथकाने त्याच्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिली. त्यामुळे त्याला जराही संशय आला नाही. दारू पाहिजे, यासाठी तीन ते चारवेळा त्याच्याशी झालेले संभाषणही रेकॉर्ड करण्यात आले होते.
पाहिजे त्या कंपनीची दारू शेलार अवघ्या दोन मिनिटात सहजपणे तयार करायचा. स्पिरीट आणि इथेनॉलचे मिश्रण तयार असायचे. यामध्ये तो शुद्ध पाणी व कंपनीनुसार रंग व सेंट मारायचा. प्रामुख्याने ढाबे व ज्या गावात दारू मिळत नाही, अशा ठिकाणीच तो दारू विकत होता. देशी दारूचा दीड हजाराचा बॉक्स हजारात, तर विदेशी दारूचा सहा हजाराचा बॉक्स साडेतीन हजारात विकायचा. मागणीनुसार तो देशी व विदेशी दारुची निर्मिती करीत होता.
सहा महिन्यांपूर्वी पथकाने छापा टाकून बनावट दारू निर्मितीचा हा कारखाना उद्ध्वस्त केल्याने, जिल्ह्यातील विषारी दारूचे हत्याकांड टळले. अन्यथा मोठे हत्याकांड झाले असते. मुंबईतील हत्याकांडामुळे या कारवाईची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)

मिथेनॉल स्वस्त...
मिथेनॉल हा विषारी व स्वस्त द्रवपदार्थ आहे. इथेनॉल आणि मिथेनॉल यामधील फरक ओळखू येत नाही. शेलारने दारू बनविताना इथेनॉलचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता. इथेनॉलच्या जागी त्याला मिथेनॉल मिळाले असते, तर विषारी दारू तयार झाली असती. ही दारू पिऊन अनेकांचे बळी गेले असते. या कारखान्याची लवकर माहिती मिळाल्याने पुढील अनर्थ टळल्याचे वास्तव मुंबईतील घटनेवरून समोर आले आहे.

Web Title: The poisonous liquor massacre in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.