शिराळ्यातील चार तलावांत विषारी मांगूर मासे, लहान मुले, प्राण्यांनाही खातो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 01:31 PM2021-05-06T13:31:48+5:302021-05-06T13:36:45+5:30
Fish Sangli : शिराळा तालुक्यातील मोरणा मध्यम प्रकल्पासह करमाळे, पाडळी, शिवणी तलावांत विषारी आणि माणसांसाठी घातक असलेला मांगूर मासा आढळून आला आहे. तो समूळ नष्ट करणे अवघड झाले आहे. दुर्घटना होण्याअगोदरच शासनाने हे मासे नष्ट करावेत, अशी मागणी होत आहे.
शिराळा : शिराळा तालुक्यातील मोरणा मध्यम प्रकल्पासह करमाळे, पाडळी, शिवणी तलावांत विषारी आणि माणसांसाठी घातक असलेला मांगूर मासा आढळून आला आहे. तो समूळ नष्ट करणे अवघड झाले आहे. दुर्घटना होण्याअगोदरच शासनाने हे मासे नष्ट करावेत, अशी मागणी होत आहे.
काही शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसायासाठी मत्स्यबीज आणले. मात्र, संबंधित व्यापाऱ्याने त्यांना फसवून मांगूर माशांचे बीज दिले. ही लहान पिल्ली असल्याने त्यावेळी लक्षात आले नाही. त्यांनी बीज पाण्यात सोडले. ती पाण्याच्या प्रवाहामुळे वाहत पुढे सरकत करमाळे, पाडळी, शिवणी तलावांसह आता मोरणा धरणामध्ये आली आहेत.
हा मासा खाल्यावर कर्करोगासारखे रोग होतात, तसेच जीवितास धोका निर्माण होतो. यामुळे त्याच्या विक्रीवर बंदी आहे. हा मासा मांसाहारी असल्याने इतर माशांना खातो. तो मोठा झाल्यास लहान मुले, कुत्रीसुद्धा भक्ष्य करू शकतो. तो समूळ नष्ट करणे आवश्यक आहे. मात्र, मोरणा धरणातील पाणी कधीही संपत नाही. त्यामुळे येथील हा मासा नष्ट करणे अवघड आहे.
महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष महादेव कदम यांनी सांगितले की, येथील काही शेतकऱ्यांची फसवणूक करून हे बीज दिले आहे. हा मासा मांसाहारी आहे. त्यामुळे इतर माशांना तो खातो. तो मोठा झाल्यास या परिसरातील पाण्याच्या संपर्कात येणाऱ्या लहान मुले, कुत्री भक्ष्य करू शकतो. शासनाने हा मासा समूळ नष्ट करावा.