प्रश्नपत्रिका काढणाऱ्यांची माहिती पोलिसांनी मागविली
By admin | Published: December 6, 2015 12:32 AM2015-12-06T00:32:03+5:302015-12-06T00:32:03+5:30
आणखी दोघे ताब्यात : आरोग्य सेवकांची चौकशी सुरूच
सांगली : जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या आरोग्यसेविका पदाच्या परीक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आणखी दोन कर्मचाऱ्यांना शनिवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, प्रश्नपत्रिका काढण्याच्या प्रक्रियेत कोण अधिकारी व कर्मचारी होते, याची तातडीने माहिती सादर करण्याचा आदेश पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी दिला आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या दोन आरोग्य सेवकांची अद्यापही चौकशी सुरु आहे. त्यांचा यामध्ये हात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेविका भरती परीक्षेत पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी कंत्राटी सेविका म्हणून कार्यरत असलेल्या व परीक्षेसाठी परीक्षार्थी म्हणून बसलेल्या शाहीन जमादार हिला कॉपी करुन पेपर लिहित असताना रंगेहात पकडण्यात आले होते. तिच्यासह तिला मदत करणारी नियमित आरोग्यसेविका शकिरा उमारणी या दोघींविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चार दिवसाच्या चौकशीनंतर दोघींना गुरुवारी रात्री अटक केली होती. पण त्यांना दुसऱ्यादिवशी लगेच जामीन मंजूर झाला होता. त्यांच्या चौकशीतून तासगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन आरोग्य सेवकांची नावे निष्पन्न झाली होती. हे दोन्ही आरोग्य मिरज तालुक्यातील आहेत. गेल्या दोन दिवसापासून त्यांची चौकशी सुरु आहेत. चौकशीतून त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती पुढे आले आहेत. पण तपासाच्याद्दष्टीने पोलिसांनी गोपनीयता बाळगून ती सांगण्यास नकार दिला.
आरोग्य सेविका भरतीची प्रश्नपत्रिका (पेपर) जिल्हा परिषदेकडून काढण्यात आली होती. या प्रक्रियेत किती अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता? प्रश्नपत्रिकेची छपाई कुठे करण्यात आली? छपाईवेळी छपाई कारखान्यात कोण-कोण उपस्थित होते? परीक्षा होईपर्यंत त्यांना तिथेच ठेवले होते का? त्यांच्याकडे मोबाईल होते का? याची सर्व माहिती तातडीने द्यावी, असा आदेश दिला आहे. पण हे प्रकरण उघडकीस आल्यापासून पोलिसांनी तपासात काही कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र ती देण्यास जिल्हा परिषदेकडून टाळाटाळ केली जात आहे.
त्यामुळे प्रश्नपत्रिका काढण्याच्या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्यांची माहिती तातडीने देण्यास सांगितले आहे. एकतर प्रश्नपत्रिका छपाईपूर्वी बाहेर पडली असण्याची शक्यता आहे किंवा छपाई केल्यानंतरही ती बाहेर काढली असावी, असा अंदाज आहे. त्याद्दष्टीने तपासाची चक्रे फिरविली जात आहेत. (प्रतिनिधी)