पोलीस प्रमुख सलग दुसऱ्या दिवशीही मिशन मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:28 AM2021-05-06T04:28:56+5:302021-05-06T04:28:56+5:30

सांगली : कोरोना रोखण्यासाठीच्या निर्बंधांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी थेट पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सुरुवात केली आहे. ...

The police chief is on mission mode for the second day in a row | पोलीस प्रमुख सलग दुसऱ्या दिवशीही मिशन मोडवर

पोलीस प्रमुख सलग दुसऱ्या दिवशीही मिशन मोडवर

Next

सांगली : कोरोना रोखण्यासाठीच्या निर्बंधांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी थेट पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सुरुवात केली आहे. मंगळवारी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा अधीक्षकांनी शहरात रस्त्यावर उतरत गर्दीत सुरू असलेली दुकाने बंद केली. महापालिका पथकाला बोलावून त्यांनी ९ दुकाने सील केली, तर विनाकारण फिरणारी दुचाकी व चारचाकी वाहने जप्त करून त्यांच्यावरही कारवाई केली.

बुधवार रात्री आठपासून लागू करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी आता पोलिसांनी कडक कारवाईस सुरुवात केली आहे. आतापर्यंत विनंती करून आणि प्रबोधन करूनही नागरिक विनाकारण बाहेर पडत असल्याने स्वत: पोलीस प्रमुखांनी कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी सायंकाळी त्यांनी स्वत: विश्रामबाग चौकात थांबत विनाकारण व बोगस पासवर फिरणाऱ्यांची वाहने जप्त करीत कारवाई सुरू केली. स्वत: पोलीस प्रमुख रस्त्यावर उतरून कारवाई करीत असल्याचे समजताच रस्ते सामसूम झाले होते.

बुधवारी पुन्हा एकदा पोलीस प्रमुखांनी कारवाई सुरूच ठेवली. यात बदाम चौकात असलेल्या मटण मार्केट परिसरातील दुकाने त्यांनी स्वत: बंद करायला लावली. शिवाय महापालिकेच्या पथकालाही पाचारण करून कारवाई केली.

बुधवार रात्रीपासून कडक लॉकडाऊन असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून दुकानात गर्दी असल्याने अधीक्षक गेडाम यांनी दुकाने सील केली. स्टेशन चौक, बालाजी चौक, पंचमुखी मारुती रोड, रिसाला रोड परिसरातून पायी चालत त्यांनी कारवाई केली.

मटण मार्केटमधून केवळ पार्सलला परवानगी असताना त्याठिकाणी विक्री सुरू असल्याचे आढळून आले, त्यामुळे या दुकानांवर कारवाई करण्यात आली. यापुढेही अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचे अधीक्षक गेडाम यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सायंकाळी उपअधीक्षक अजित टिके यांनीही शहरात गस्त घालत कारवाई केली.

चौकट

अत्यावश्यक सेवांचा पास आणि जप्ती

वाहनांवर अत्यावश्यक सेवा म्हणून मोठा कागद लावून फिरणाऱ्यांवर वाहन जप्तीची कारवाई करण्यात आली. प्रशासनाने अशी कोणालाही परवानगी दिली नसताना वाहनावर पास लावून फिरणाऱ्यांना पोलिसांनी दणका दिला. बोगस ओळखपत्र घेऊन फिरणाऱ्यांवरही आता कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: The police chief is on mission mode for the second day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.