Police Commemoration Day : 'देशासाठी लढताना शहीद झालेले पोलीस नेहमीच स्मरणात राहतील'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 02:04 PM2018-10-21T14:04:41+5:302018-10-21T14:25:27+5:30
पोलिसांमुळेच समाजाला आजही सुरक्षिततेची भावना वाटते. समाजात शांतता तसेच कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्याचे काम खऱ्या अर्थाने पोलिसच करीत आहेत.
सांगली - पोलिसांमुळेच समाजाला आजही सुरक्षिततेची भावना वाटते. समाजात शांतता तसेच कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्याचे काम खऱ्या अर्थाने पोलिसच करीत आहेत. देशासाठी लढताना प्राणांची आहूती दिलेले शहीद पोलीस अधिकारी व कर्मचारी नेहमीच स्मरणात राहतील, असे मत जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी व्यक्त केले.
जिल्हा पोलीस दलातर्फे रविवारी सकाळी विश्रामबाग येथील पोलीस मुख्यालयात शहीद पोलीस स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात काळम-पाटील बोलत होते. ते म्हणाले, देशाच्या सीमेवर संरक्षण करताना शहीद होणाऱ्या पोलिसांची संख्या वाढत आहे. जम्मू-काश्मीरमध्येही पोलिसांवरील हल्ले वाढत आहेत. अन्यत्र ठिकाणीही पोलिसांना टार्गेट करुन हल्ले केले जात आहे. पोलिसांवरील वाढते हल्ले, ही चिंताजनक बाब आहे. पोलीस आपल्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत आहे, असे विसरुन चालणार नाही.
यावेळी नांदेड परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंग पाटील, जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे, पोलीस उपअधीक्षक अशोक विरकर, अनिकेत भारती, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. देशभरातील एकूण ४१६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
लडाख येथे २१ आॅक्टोबर १९५९ रोजी देशाचे संरक्षण करणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील दहा पोलीस शिपायांच्या तुकडीवर चिनी लष्कराने हल्ला केला होता. या तुकडीने त्याच्याशी लढा देताना प्राणांची आहुती दिली होती. तेंव्हापासून २१ आॅक्टोंबर हा दिवस शहिर पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो.
फैरी झाडून मानवंदना
परेड सलामी शस्त्र व शोक शस्त्र करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते शहीद स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून शहीद पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. देशासाठी शहीद झालेल्या अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांच्या यादीचे वाचन करण्यात आले. बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली.