सुयोग औंधकरसह साथीदारास पोलीस कोठडी-खंडणीचे प्रकरण : तक्रारींचा ओघ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 11:30 PM2019-02-02T23:30:10+5:302019-02-02T23:34:13+5:30
येथील सहकारी संस्थांचे सहायक निबंधक अमोल डफळे यांच्याकडून १0 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोघांना येथील न्यायालयाने ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी ही
इस्लामपूर : येथील सहकारी संस्थांचे सहायक निबंधक अमोल डफळे यांच्याकडून १0 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोघांना येथील न्यायालयाने ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी ही खंडणीखोरी उघडकीस आणल्यानंतर, औंधकर व जंगमच्या विरोधात खंडणीच्या तक्रारींचा ओघ सुरु झाला आहे.
संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष सुयोग गजानन औंधकर (वय ४0, रा. कासेगाव) आणि माहिती अधिकार कार्यकर्ता कृष्णा विश्वनाथ जंगम (५५, वाळवा) यांना खंडणीप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी बाजार समिती आवारातील सहायक निबंधक कार्यालयातच पकडण्यात आले होते.
वाळवा येथील हुतात्मा सह. साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जांची प्रसिध्दी नोटीस फलकावर का जाहीर केली नाही, असे क्षुल्लक कारण पुढे करत औंधकर आणि जंगम अशा दोघांनी सहायक निबंधक डफळे यांना ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली. जानेवारी १७ ते जानेवारी १९ अशी २ वर्षे या दोघांचा हा उपद्व्याप सुरु होता. शेवटी १0 लाखांची खंडणी मागत कार्यालयातच जाऊन ती स्वीकारण्याचे धाडस करणाºया औंधकरच्या मुसक्या पोलीस उपअधीक्षक कृष्णत पिंगळे यांनी आवळल्या.
औंधकर व जंगमविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, त्याचे अनेक कार्यालयांतील खंडणीखोरीचे कारनामे समोर येऊ लागले आहेत. त्यांच्या या टोळीमध्ये आणखी काही जणांचा समावेश असून काही नावे निष्पन्न झाल्याचे पिंगळे यांनी स्पष्ट केले. येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातही औंधकरने खंडणीची मागणी केली होती. वाळवा येथील ग्रामपंचायत कार्यालयातील लिपिकाकडे १५ लाखांची खंडणी मागितल्याची चर्चा आहे. पण यासंदर्भात तक्रार दाखल झाली नाही. इस्लामपूरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनाही त्याने खंडणी मागितल्याचे समजते.या सर्व प्रकरणात औंधकर आणि त्याच्या साथीदारांविरुध्द इस्लामपूर आणि आष्टा पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद घेण्याचे काम सुरु होते.
औंधकर-जंगमाचा संघटनाकडून निषेध
संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता सुयोग औंधकर व माहिती अधिकार कार्यकर्ता कृष्णा जंगम यांना खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केल्यानंतर वाळवा तालुक्यातील बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व इतर हिंदुत्ववादी संघटनांसह मुस्लिम समाज संघटनेच्यावतीने दोघांचा निषेध करण्यात आला. या दोघांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशा भुरट्या कार्यकर्त्यांना शासकीय कार्यालयात प्रवेशबंदी करावी, अशी मागणी अनिल वाळवेकर, सचिन पाटील, जयसिंग बेनाडे, संतोष सपाटे, इब्राहीम मुजावर यांनी प्रांताधिकाºयांकडे केली आहे.