मिरजेत दाम्पत्य आत्महत्याप्रकरणी पोलिस हवालदारावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:18 PM2018-01-18T23:18:46+5:302018-01-18T23:18:52+5:30
मिरज : मिरजेत सुंदरनगर येथील अभिजित विजय पाटील व कल्याणी पाटील या दाम्पत्यास आत्महत्येस प्रवृत्त करणाºया महिला खासगी सावकारास मदत केल्याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यातील हवालदार
मिरज : मिरजेत सुंदरनगर येथील अभिजित विजय पाटील व कल्याणी पाटील या दाम्पत्यास आत्महत्येस प्रवृत्त करणाºया महिला खासगी सावकारास मदत केल्याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यातील हवालदार साईनाथ ठाकूर याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाम्पत्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलिस हवालदार आरोपी झाल्याने खळबळ उडाली आहे.
औषध विक्री दुकान असलेल्या अभिजित पाटील याने व्यवसायासाठी जयसिंगपुरातील मांत्रिक लक्ष्मीनिवास तिवारी याच्या मध्यस्थीने पंडित नाईक व मिरजेतील बेबी मोहन अंडीकाठ या महिला सावकाराकडून सुमारे ३२ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सावकारांचे हे कर्ज फेडण्यासाठी त्याला स्वत:च्या मालकीचा बंगला विकून भाड्याचे घर घ्यावे लागले होते. सावकारांनी कर्ज परतफेडीसाठी धमक्या देण्यास सुरुवात केल्याने पाटील कुटुंबीय अस्वस्थ होते. खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून दि. २५ आॅगस्टरोजी अभिजित याची पत्नी कल्याणी हिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
हे प्रकरण मिरजेतील काही नेतेमंडळींच्या मध्यस्थीने मिटविण्यात आले होते.
मात्र इचलकरंजीतील पंडित नामक सावकार कर्ज वसुलीसाठी पुन्हा धमक्या देऊ लागल्याने अभिजित पाटील याने पोलिसात तक्रार अर्ज दिला होता. तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी व कर्जाची रक्कम व्याजासह परत देण्यासाठी इचलकरंजीतील सावकाराने व मिरजेतील बेबी मोहन अंडीकाठ या महिला सावकाराने त्याला त्रास देण्यास सुरुवात केल्याने दि. ३० आॅक्टोबरला अभिजित पाटील यानेही झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली. दोन महिन्यांच्या कालावधित तरुण दाम्पत्याच्या झालेल्या आत्महत्येप्रकरणी गांधी चौक पोलिसात लक्ष्मीनिवास तिवारी, पंडित नाईक, बेबी मोहन अंडीकाठ या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेबी मोहन अंडीकाठ या महिला सावकारास मदत केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने हवालदार साईनाथ ठाकूर याच्याविरुध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साईनाथ ठाकूर सातत्याने वादग्रस्त
हवालदार साईनाथ ठाकूर सातत्याने वादग्रस्त ठरला आहे. अनेक आर्थिक तडजोडीत त्याचे नाव पुढे आले आहे. यातूनच मध्यंतरी त्याची बदली चांदोली धरणाच्या गेटवर करण्यात आली होती. मात्र त्याने पुन्हा ‘कनेक्शन्स’ वापरून इकडे बदली करून घेतली. दाम्पत्याची आत्महत्या व खासगी सावकारीप्रकरणी तिवारी, नाईक व बेबीमोहन या तिघांनीही अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने तिघांना शनिवार दि. २० पर्यंत अंतरिम जामीन दिला आहे. साईनाथ ठाकूर यानेही सांगली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.