पोलिस नियंत्रण कक्षात बॉम्ब ठेवल्याचा ‘कॉल’; पोलिसांची धावपळ
By घनशाम नवाथे | Updated: January 4, 2025 21:17 IST2025-01-04T21:17:45+5:302025-01-04T21:17:58+5:30
मालगावचा तळीराम अखेर ताब्यात

पोलिस नियंत्रण कक्षात बॉम्ब ठेवल्याचा ‘कॉल’; पोलिसांची धावपळ
घनशाम नवाथे/ लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : तारीख : ४ जानेवारी..स्थळ : डायल ११२ कंट्रोल रूम...वेळ : सकाळी ११.३०... फोन खणखणला...‘सांगली कंट्रोल रूममध्ये बॉम्ब लावला आहे, पोलिस मदत हवी आहे’ असे समोरून सांगितल्यानंतर फोन कट...मग पोलिसांची धावपळ सुरू...पोलिस नियंत्रण कक्ष, अधीक्षक कार्यालय, बसस्थानक येथे बॉम्बशोधक पथकाची तपासणी...अखेर खोटा कॉल असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मालगाव (ता. मिरज) येथील यमनाप्पा मरगप्पा माडर (वय ५०, रा. तवटे मळा) या तळीरामास ताब्यात घेतले.
शनिवारी सकाळी ११.३० वाजता डायल ११२ वर कॉल आल्यानंतर फोन करणाऱ्याने ‘सांगली पोलिस कंट्रोल रूममध्ये बॉम्ब लावला, पोलिस मदत हवी आहे’ अशी अर्धवट माहिती देत फोन कट केला. हा कॉल शहर पोलिस ठाण्याकडे डायल ११२ वर कार्यरत पोलिस कर्मचारी वसिम मुलाणी यांना ट्रान्सफर झाला. त्यांनी गांभीर्य ओळखून वरिष्ठांना माहिती दिली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी तत्काळ आदेश दिले. त्यानंतर पोलिस नियंत्रण कक्ष, अधीक्षक कार्यालय, बसस्थानक येथे बॉम्बशोधक पथकाला पाठवून तपासणी करण्यात आली. परंतू तेथे कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही. त्यामुळे खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे खोटा कॉल करणाऱ्याचा शोध सुरू केला. सहायक निरीक्षक नितीन सावंत व पथकाने हा कॉल मालगाव (ता. मिरज) येथून आल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर कॉल करणाऱ्या यमनाप्पा माडर याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने दारूच्या नशेत कॉल केल्याचे कबुल केले.
दरम्यान कोणताही खोटा कॉल करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास अशा व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिला आहे.
यापूर्वी पोलिसांना खोटा कॉल
यमनाप्पा माडर याने यापूर्वीही २०२३ मध्ये असाच कॉल करून गोंधळ उडवून दिला होता. त्याबद्दल मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. माडर याला शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.