कामटेसह पाचजणांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:14 AM2017-11-10T00:14:16+5:302017-11-10T00:15:34+5:30

Police detained for five people including Kamte | कामटेसह पाचजणांना पोलीस कोठडी

कामटेसह पाचजणांना पोलीस कोठडी

googlenewsNext


सांगली : पोलीस कोठडीतील संशयित अनिकेत कोथळे याच्या मृत्यूप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह
पाचजणांना गुरुवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या पाचहीजणांना १३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, सहावा संशयित अनिल लाड याला तपासकामासाठी पोलिसांनी ताब्यात ठेवल्याने, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले नाही. संशयितांना न्यायालयात आणले जाणार असल्याचे वृत्त पसरल्याने न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती.
सांगली आकाशवाणीजवळ एका अभियंत्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून दोन हजार रुपये आणि मोबाईल पळविल्याप्रकरणी शहर पोलिसांनी संशयित म्हणून अनिकेत अशोक कोथळे (वय २६) आणि अमोल सुनील भंडारे (२३, दोघे रा. भारतनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) यांना दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. दोघांना सोमवारी रात्री चौकशीसाठी बाहेर काढल्यावर. दोघेही पळाले, असा बनाव पोलिसांनी रचला. अनिकेत कोथळेच्या कुटुंबीयांनी घातपाताची शंका व्यक्त केल्याने हे प्रकरण तापले. अनिकेतला पोलिसांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे बुधवारी उघड झाले. त्याचा मृतदेह पोलिसांनी आंबोली घाटात जाळला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले या सहा जणांना अटक केली होती.
दरम्यान, गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास कामटे याच्यासह अरुण टोणे, मुल्ला, शिंगटे व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले या पाच जणांना कडेकोट बंदोबस्तात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. पी. खापे यांच्या न्यायालयात हजर केले. संशयितांना न्यायालयात आणले जाणार असल्याचे समजताच या परिसरात गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी फौजफाटा तैनात केला होता. पाच ते सहा वाहने एकमेकांमागे लावून संशयित कामटे व चार जणांना काळे बुरखे घालून न्यायालयात आणले.
सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता उज्ज्वला आवटे यांनी बाजू मांडली. पोलिस ठाण्यात झालेली घटना अत्यंत गंभीर आहे. कोथळेच्या मृत्यूप्रकरणी संशयितांची भूमिका निश्चित करावयाची आहे. संशयितांनी मारहाण करताना कशाचा वापर केला, त्याचा मृतदेह कोणत्या वाहनातून नेला, आंबोलीपर्यंत जाण्यासाठी त्यांना कोणी मदत केली, याचा तपास करण्यासाठी १४ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने या पाच संशयितांना १३ दिवसांची कोठडी सुनावली. पोलिसांनी या पाचही संशयितांना न्यायालयातून हलविले. सहावा संशयित अनिल लाड याला पोलिसांनी तपासकामी ताब्यातच ठेवल्याने न्यायालयात हजर केले नाही.
गुन्हा व अटकेबाबत साशंकता
अनिकेत व अमोल या दोघांना लूटमारप्रकरणी अटक करण्यात आली. या प्रकरणात संतोष गायकवाड (रा. कवलापूर) याने फिर्याद दिली होती. गायकवाड मुंबईत राहतो. तो मूळचा कवलापूरचा आहे.
त्यामुळे पोलिसात दाखल केलेला लूटमारीचा गुन्हाच बनावट असल्याचा दावा कोथळे कुटुंबियांनी केला असून, फिर्यादी गायकवाड याचीही चौकशीची मागणी केली आहे. अटकेतील दोघांपैकी केवळ अनिकेतलाच पोलिसांनी मारहाण केली आहे.
तसेच तो ज्या बॅग्ज हाऊसमध्ये काम करीत होता, तेथील दुकानदाराबाबतही नातेवाईकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणात दुकानदाराच्या चौकशीची मागणी होत आहे.
सीआयडी
ताबा घेणार
कोथळे मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. सीआयडीचे अप्पर अधीक्षक नरेंद्र गायकवाड, उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांचे पथक कालपासून सांगलीत तळ ठोकून आहे. अद्याप सीआयडीने सहाही संशयितांचा ताबा घेतलेला नाही. तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर रात्री उशिरा सर्वांना ताब्यात घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले. सीआयडीचे पथक न्यायालयाच्या आवारातही उपस्थित होते.
केवळ दोन हजारासाठी...
कवलापूर येथील संतोष गायकवाड याने दिलेल्या फिर्यादीवरून अनिकेत व अमोल या दोघांना पोलिसांनी पकडले होते. संतोष याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील दोन हजाराची रोकड व मोबाईल काढून घेतल्याची तक्रार त्याने केली होती. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला. त्याच्या नातेवाईकांनी मात्र ही तक्रारच खोटी असल्याचा दावा केला आहे. केवळ दोन हजाराच्या लुटीच्या प्रकरणातील तथ्य सीआयडीकडून समोर आणले जाईल; पण या प्रकरणात अनिकेतला मात्र आपला जीव गमावावा लागला.

Web Title: Police detained for five people including Kamte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा