जतजवळ चंदनाच्या झाडांची चोरी, तक्रार देवूनही पोलीस घटनास्थळी दाखल नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 12:45 PM2021-11-20T12:45:58+5:302021-11-20T12:47:27+5:30
जत : जत शहरातील विजापूर-गुहागर महामार्गालगत घराजवळची चंदनाची झाडे तस्करांनी पळवून नेल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. यात सुमारे ५० ...
जत : जत शहरातील विजापूर-गुहागर महामार्गालगत घराजवळची चंदनाची झाडे तस्करांनी पळवून नेल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. यात सुमारे ५० हजाराचे चंदन चोरीला गेल्याचा अंदाज आहे. जत पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आली. मात्र घटनास्थळी अद्याप पोलीस कर्मचारी पोहचले नाहीत.
शहरातील विजापूर महामार्गालगत माळी पार्क येथे डॉ. शिवानंद माळी यांचा बंगला व शेती आहे. बंगल्याजवळ त्यांनी काही चंदनाची झाडे लावली असून झाडे सात-आठ वर्षाची आहेत. अगदी महामार्गालगत डॉ. माळी यांचा बगीचा आहे, त्यात चंदनासह अनेक दुर्मिळ, औषधी झाडे आहेत. मध्यरात्री टेहळणी करून चंदन तस्करांनी चार मोठे चंदन वृक्ष कटरने कापून मुख्य खोड पळवून नेले आहे.
यात सुमारे ५० हजाराचे चंदन चोरीला गेल्याचा अंदाज आहे. याबाबत डॉ. माळी यांनी आज, शनिवारी सकाळी जत पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिली. मात्र पंचनाम्यासाठी कर्मचारी पाठवितो, तुम्ही पुढे चला म्हणून डॉ. माळी यांना पाठविण्यात आले. त्यानंतर मात्र एकही पोलीस कर्मचारी घटनास्थळी फिरकला नसल्याचे डॉ. माळी यांनी सांगितले.