लाचेची रक्कम घेऊन पोलीस गायब!

By Admin | Published: February 12, 2016 12:10 AM2016-02-12T00:10:18+5:302016-02-12T23:39:35+5:30

पलूस प्रकरणाला नवे वळण : सहायक फौजदारासह दोघांना पोलीस कोठडी; पांचाळ यांची तडकाफडकी बदली

Police disappear with ammunition! | लाचेची रक्कम घेऊन पोलीस गायब!

लाचेची रक्कम घेऊन पोलीस गायब!

googlenewsNext

सांगली : पलूस येथे वाईन शॉप दुकानावर कारवाई न करण्यासाठी ४० हजारांची लाच घेताना सहायक फौजदारासह दोन पोलिसांना पकडल्याच्या कारवाईस वेगळेच वळण लागले आहे. लाचेची रक्कम पोलीस नाईक महेश भिलवडे याने स्वीकारली अन् तो क्षणात गायबही झाला. ज्याच्याविरुद्ध तक्रार होती, तो सहायक फौजदार भगवान मोरे व हवालदार मोहन चव्हाण सापडले; पण त्यांच्याकडे काहीच सापडले नाही. हा प्रकार लक्षात येताच ‘लाचलुचपत’च्या पथकाने भिलवडेचा पाठलाग केला; मात्र तो सापडला नाही.
बुधवारी रात्री ही कारवाई झाली होती. अटकेत असलेल्या भगवान मोरे व मोहन चव्हाण यांना गुरुवारी दुपारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सहायक पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांची तडकाफडकी पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. लाचेच्या रकमेसह भिलवडे गायब झाल्याने त्याचा शोध सुरु आहे. मात्र अद्याप त्याचा सुगावा लागलेला नाही. प्रत्यक्षात लाचेची मागणी व ती स्वीकारल्याप्रकरणी मोरे, चव्हाण व भिलवडे या तिघांविरुद्धही पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ‘लाचलुचपत’चे पोलीस निरीक्षक हरिदास जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे. एकाचवेळी तीन पोलीस लाचलुचपतच्या जाळ्यात सापडण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.
पलूसमध्ये मिरजेतील एकाचे वाईन शॉप आहे. या दुकानावर कारवाई न करण्यासाठी प्रत्येक महिन्याला २० हजाराचा हप्ता देण्याची मागणी मोरे व चव्हाण यांनी केली होती. गेल्या दोन महिन्यांपासून हप्ता द्यावा, यासाठी मोरे आणि चव्हाण दुकान मालकाकडे तगादा लावून होते. मालकाने हप्ता देण्याची तयारी दर्शविल्यानंतर त्यांनी जानेवारी व फेब्रुवारी अशा दोन महिन्यांचा ४० हजार रुपये हप्ता देण्यासाठी दरडावले होते. त्यामुळे मालकाने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार दाखल केली. लाचलुचपतच्या पथकाने लावलेल्या सापळ्यानुसार मालकाने लाचेची रक्कम बुधवारी रात्री पलूसच्या कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील गणेश ज्युस सेंटरमध्ये देतो, असे सांगितले. तत्पूृर्वी पथकाने तिथे सापळा लावला. मालक रक्कम घेऊन जाण्यापूर्वी तिथे चव्हाण, मोेरे व भिलवडे हजर होते. मोरे व चव्हाण यांनी लाचेची रक्कम भिलवडेकडे देण्यास सांगितले. त्यानुसार रक्कम मिळताच भिलवडे तेथून क्षणात गायब झाला.
तक्रारदार मालकाने ज्यूस सेंटरमधून बाहेर आल्यानंतर पथकाला सिग्नल दिला. पथक तातडीने आत गेले. त्यांनी मोरे आणि चव्हणला पकडले. परंतु त्यांच्याकडे लाचेची रक्कम नव्हती. या प्रकारामुळे पथकही गोंधळात पडले. चव्हाण, मोरेची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी लाचेची रक्कम भिलवडेकडे असल्याचे सांगितले. भिलवडे बाजार समितीच्या दुसऱ्या प्रवेशद्वारातून पळाला होता. पथकाने त्या दिशेने त्याचा पाठलाग केला. मात्र अंधार असल्याने तो पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. मुळात लाचेची मागणी केल्याची तक्रार चव्हाण व मोरेविरुद्ध होती. त्यामुळे पथकाने त्यांच्यावरच अधिकच लक्ष केंद्रीत केले होते. कदाचित त्यांना सापळा लागेल, अशी भीती वाटल्यानेच त्यांनी भिलवडेला बोलावून घेतले असावे, अशी चर्चा आहे. भिलवडे हा कबडीपटू असून, तो मूळचा वाळव्याचा आहे. (प्रतिनिधी)


सरांना द्यावे लागतात
संशयित मोरे, चव्हाण यांनी लाचेची मागणी करताना, ‘सरांना पैसे द्यावे लागतात’, असे तक्रारदार वाईन शॉप मालकास अनेकदा सांगितल्याचे ‘लाचलुचपत’च्या रेकॉर्डवर आले आहे. तसेच भिलवडे यानेही रक्कम स्वीकारताना मालकास ‘सरांना पैसे द्यावे लागतात’, असे सांगितले. त्यामुळे ‘सर कोण’, अशी चर्चा सुरू आहे.



शंकर पांचाळ : नियंत्रण कक्षात
सहायक पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांना सहा महिन्यांपूर्वी पलूस पोलीस ठाण्याचा कार्यभार सोपविण्यात आला होता. तत्पूर्वी ते सांगली शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण शाखेत (डीबी) नियुक्तीस होते. माधवनगर रस्त्यावरील पंचशीलनगर येथील शशिकांत पावसकर या तरुणाच्या खुनाचा तपास त्यांच्याकडे होता. पण त्यांना या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावता आला नव्हता. त्यांचीसांगलीतील कारकीर्द थोडीशी वादग्रस्त ठरली होती. ‘डीबी’ पथकाकडून अनेक वादग्रस्त भानगडी त्यांच्या काळात घडल्या होत्या. तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी पथकास कार्यालयात बोलावून चांगलेच फैलावरही घेतले होते. सध्याच्या लाच प्रकरणाचीही जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पांचाळ यांची तडकाफडकी पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बदली केली आहे.

Web Title: Police disappear with ammunition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.