मिरजेत अरब नागरिकांवर पोलिसांची नजर
By Admin | Published: December 29, 2015 11:30 PM2015-12-29T23:30:52+5:302015-12-30T00:34:09+5:30
पोलिसांच्या सूचना : शहरातील सर्वच लॉज, रुग्णालये, तसेच एजंटांना नोंदणी करण्याची सक्ती
मिरज : ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेच्या धोक्यामुळे आखाती देशांतून मिरजेत येणाऱ्या अरब नागरिकांच्या आगमनावर पोलिसांची नजर आहे. वैद्यकीय उपचाराच्या कारणासाठी मिरजेत येणाऱ्या अरबांच्या नोंदणीची लॉजसह रुग्णालये व एजंटांवरही सक्ती करण्यात आली आहे. व्हिसाची मुदत संपलेल्या अरबांना परत पाठविण्यात येत आहे.
मिरजेत वैद्यकीय सुविधा मिळत असल्याने आखाती देशातील कतार, मस्कत, ओमान, बहारीन, सौदी, दुबई या देशांतील अरब मिरजेत येतात. तृतीय व चतुर्थश्रेणी कामगार किंवा छोटे व्यावसायिक अरब मिरजेत व श्रीमंत उच्चशिक्षित अरब भारतात मुंबई, दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरात जातात. एकेकाळी हजारोच्या संख्येने मिरजेत येणाऱ्या अरबांची संख्या वेगवेगळ्या कारणांमुळे रोडावली आहे. मात्र गेल्या दोन वर्षात अरब पर्यटकांची संख्या वाढली आहे. पर्यटक म्हणून आलेल्या अरबांनी मिरजेत वेगळ्या हालचाली करू नयेत, यासाठी पोलीस यंत्रणेने त्यांच्या येण्या-जाण्याच्या नोंदी घेण्यास सुरूवात केली आहे. १९८० पासून पर्यटन व उपचाराच्या कारणासाठी अरब मिरजेत येत आहेत. मिरजेत केवळ अरबांसाठी काही लॉज सुरू आहेत. आॅक्टोबर ते फेब्रुवारी या हंगामात अरब मोठ्या संख्येने मिरजेत येतात. या अरबांना मिरजेत सर्व सुविधा पुरविणारे एजंट प्रत्येक लॉजवर आहेत. अरबांच्या संपर्कामुळे लॉजवरील वेटरपासून रिक्षावाल्यांपर्यंत सर्वजण अरबी बोलतात. मिरजेत यापूर्वी हजारो अरब येत असल्याने लॉजसह काही रुग्णालयांचे फलकही अरबी भाषेत झळकत होते. अरब पर्यटकांमुळे मिरजेतील व्यवसाय, उद्योगांना आधार मिळाला. मात्र त्यातून गैरप्रकार सुरू झाले.
स्वस्तात मौजमजेसाठी मिरजेकडे येणाऱ्या अरब पर्यटकांच्या गैरवर्तणुकीविरूध्द ३० वर्षापूर्वी मिरजेत अरब हटाव आंदोलन झाले होते. यामुळे मिरजेकडे येणाऱ्या अरबांची संख्या कमी होऊन अरब पर्यटक हैदराबाद व बेंगलोरकडे वळले. मात्र आता पुन्हा एकदा मिरजेत अरब पर्यटक येत असल्याने इराक, सिरियातील दहशतवादी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेने येणाऱ्या-जाणाऱ्या अरबांच्या नोंदी सुरू केल्या आहेत.
एजंटांकडून संशयित अरबांच्या हालचालींची माहिती घेण्यात येत आहे. यापूर्वी केवळ लॉजवर येणाऱ्या अरबांची जिल्हा विशेष शाखेकडे नोंद करण्यात येत होती. मात्र आता एजंटांकडे किंवा उपचारासाठी रुग्णालयात वास्तव्य करणाऱ्या अरबांचीही नोंद करणे सक्तीचे करण्यात आले आहे. व्हिसा संपलेल्या अरबांची रवानगी त्यांच्या देशात करण्यात येत आहे. (वार्ताहर)
मौल्यवान वस्तू : संघर्षास कारणीभूत
अरबांच्या आगमनाची स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करून, सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ वास्तव्य करणाऱ्या अरबांची मुख्यालयात जिल्हा विशेष शाखेत नोंद होते. गतवर्षी मिरजेत सुमारे ३५० अरबांचे आगमन झाले. मात्र त्यापैकी मध्य पूर्वेतील देशांतील कोणीही अरब नसल्याची माहिती मिळाली. अरब येताना सोबत सोने, मौल्यवान वस्तू घेऊन येत असल्याने, या कारणावरून संघर्ष होऊन मिरजेत यापूर्वी एजंटांच्या खुनाच्या घटना घडल्या आहेत.
हवालाबाबत पोलिसांना संशय...
पर्यटक म्हणून येणाऱ्या अरबांमार्फत आखाती देशांतून भारतात रोख रक्कम पाठविण्याचा उद्योग हवाला एजंटांमार्फत होत असल्याची चर्चा आहे. आता अरब नागरिक पोलिसांच्या रडारवर आहेत.