बांगलादेशी दलालाच्या शोधात पोलीस अपयशी

By admin | Published: June 29, 2015 11:35 PM2015-06-29T23:35:57+5:302015-06-30T00:16:12+5:30

वरिष्ठांकडून कानउघाडणी : नगरसेवकाचा हात असल्याची चर्चा

Police failure in search of Bangladeshi brokers | बांगलादेशी दलालाच्या शोधात पोलीस अपयशी

बांगलादेशी दलालाच्या शोधात पोलीस अपयशी

Next

सांगली : बांगलादेशी अल्पवयीन मुलीसह गायब झालेल्या बांगलादेशी दलालाच्या शोधासाठी विश्रामबाग पोलीस अपयशी ठरले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कानउघाडणी करून त्याचा तातडीने शोध घेण्याचा आदेश दिला आहे. मात्र त्याचा शोध घेण्यासाठी कोणताही धागा पोलिसांजवळ नाही. त्यामुळे त्यांनी संजय गांधी झोपडपट्टीतील नागरिकांची मदत घेऊन शोध सुरू ठेवला आहे. या प्रकरणात एका नगरसेवकाचा हात असल्याची चर्चा असून, पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.दोन दिवसांपूर्वी संजय गांधी झोपडपट्टीत एका बारा वर्षाच्या बांगलादेशी मुलीसह हा दलाल सापडला होता. तो या मुलीस मारहाण करीत होता. तिला त्याने खोलीत कोंडून ठेवले होते. वेश्या व्यवसायासाठी त्याने या मुलीची बांंगला देशमधून तस्करी केल्याचा संशय झोपडपट्टीतील नागरिकांना आला होता. त्यामुळे त्यांनी दलालास पकडून विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर, ही मुलगी आपली पुतणी असल्याचे दलालाने सांगितले होते. यासंदर्भातील पुरावे सादर करण्यास दलालास सांगितले होते. या दलालाने, रविवारी सकाळी पुरावे देतो, असे सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला मुलीसह सोडून दिले होते. मात्र दुसऱ्यादिवशी तो आलाच नाही. पोलिसांनी तो राहत असलेल्या झोपडपट्टीतील खोलीवर छापा टाकला. मात्र तो खोलीला कुलूप लावून मुलीसह गायब झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला सोडलेच कसे?, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला असून, एका नगरसेवकाने ‘अर्थ’पूर्ण तडजोडीतून हे सर्व जुळवून आणल्याची चर्चा आहे.
विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याने हा तपास महिला पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्याकडे सोपविला होता. पत्की यांच्या पथकाने झोपडपट्टीतील नागरिकांकडे चौकशी केली असता, हा दलाल बांगला देशला गेल्याची माहिती मिळाली होती. तो पुन्हा येणार का नाही, हे आम्ही सांगू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. दलालाने एका रात्रीत झटका देत पलायन केल्याने पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. त्याला उगाचच सोडून दिले, असे पोलीस बोलून दाखवत आहेत. (प्रतिनिधी)

शोध घेणार कसा?
पोलिसांनी या बांगलादेशी दलालाचे मोबाईलवर साधे छायाचित्रही घेतले नाही. त्याचे कोठेही रेकॉर्ड बनविले गेले नाही. या मुलीचेही छायाचित्र घेतले गेले नाही. त्याच्याबद्दल काहीच माहिती मिळत नसल्यामुळे त्याचा शोध घेणार कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हलगर्जीपणा भोवणार

एकंदरीत हा सारा घटनाक्रम पाहता, अत्यंत गंभीर असलेल्या या प्रकाराबाबत पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचे उघड होत आहे. हा हलगर्जीपणा संबंधितांना चांगलाच भोवणार, हे निश्चित.

Web Title: Police failure in search of Bangladeshi brokers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.