पोलीस फौजदार चौधरी निलंबित
By admin | Published: July 12, 2015 11:19 PM2015-07-12T23:19:13+5:302015-07-13T00:33:41+5:30
खातेनिहाय चौकशी : गोवा वारी आली अंगलट
सांगली : तपासासाठी केलेली गोव्याची वारी एका पोलीस फौजदाराच्या चांगलीच अंगलट आली आहे. संभाजी चौधरी असे या फौजदाराचे नाव आहे. गोव्यात तपासाला जाताना कोणतीही परवानगी न घेतल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. ते जत पोलीस ठाण्यातील नियुक्तीस होते. जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी ही कारवाई केली. त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेशही फुलारी यांनी दिले आहेत.जतमधील एक अल्पवयीन मुलगी पळवून नेण्यात आली होती. त्याचा तपास चौधरी यांच्याकडे होता. ही मुलगी संशयित तरुणासोबत गोव्यात असल्याची माहिती मिळताच चौधरी स्वत: गोव्याला गेले होते. तिथे पुढील कार्यवाही करताना त्यांनी खाकी गणवेश पिशवीत घातला होता. साधा गणवेश घालून ते संशयितास पकडण्यासाठी गेले होते. यासाठी त्यांनी तेथील गोवा पोलिसांची मदत घेतली नाही.चौधरी यांनी आपण पोलीस फौजदार असल्याचे ओळखपत्र दाखविले होते. तरीही कारवाईदरम्यान त्यांचा वाद झाल्याने गोवा पोलिसांनी पोलीसप्रमुख फुलारी यांच्याशी संपर्क साधला होता. फुलारी या प्रकणाची चौकशी केली असता, चौधरी यांनी तपासाला जाताना कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समजले. चौकशी करून अहवाल देण्याचा आदेश दिला आहे. (प्रतिनिधी)
निलंबित अन् पदोन्नती
चौधरी यांना आठवड्यापूर्वी निलंबित करण्यात आले आहे. त्याचदिवशी त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली होती. पदोन्नतीवर त्यांची जिल्ह्याबाहेर बदलीही होणार होती. पण त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने पदोन्नतीसह पुढील सर्व प्रक्रिया थांबली आहे.