मिरजेत भरवस्तीतील मोबाईल दुकान फोडले -सहा लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 11:01 PM2019-02-08T23:01:53+5:302019-02-08T23:02:25+5:30
मिरजेत शनिवार पेठेत गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी भर वस्तीतील स्कायसेल मोबाईल हे दुकान फोडून सहा लाख रूपये किमतीचे मोबाईल चोरून नेले.
मिरज : मिरजेत शनिवार पेठेत गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी भर वस्तीतील स्कायसेल मोबाईल हे दुकान फोडून सहा लाख रूपये किमतीचे मोबाईल चोरून नेले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
शनिवार पेठेत मुख्य रस्त्यावर अभिजित सुस यांच्या मालकीचे स्कायसेल मोबाईल हे दुकान आहे. गुरूवारी मध्यरात्री दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील शोकेसमधील विविध कंपन्यांचे ४० मोबाईल, ड्रॉव्हरमधील २४ हजार रोख रक्कम असे ६ लाख चोरून नेण्यात आले. शुक्रवारी सकाळी दुकानाचे शटर उचकटलेले दिसल्याने चोरीचा प्रकार समजल्यानंतर अभिजित सुस यांनी शहर पोलिसात तक्रार केली. पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. चोरटे दुकानातील किमती अॅन्ड्रॉईड मोबाईल घेऊन गेले. कमी किमतीच्या मोबाईलला चोरट्यांनी हात लावला नाही.
चोरट्यांची कोणतीही वस्तू तेथे सापडली नसल्याने श्वानपथकाद्वारे चोरट्यांचा माग काढणे शक्य झाले नाही. चोरट्यांनी तेथून वाहनाने पलायन केल्याचा पोलिसांचा संशय आहे.
याप्रकरणी दुकानमालक अभिजित सुस यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून दुकानातून सहा लाखाचे मोबाईल चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुकानात सीसीटीव्ही यंत्रणा आहे. मात्र तांत्रिक बिघाडामुळे सीसीटीव्हीमध्ये चोरट्यांचे चित्रण पोलिसांना मिळाले नाही. चोरीप्रकरणी पोलिसांनी सराईत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
एकच दुकान तीनवेळा फोडले
स्कायसेल हे मोबाईल दुकान यापूर्वी दोनवेळा फोडण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षात हे दुकान फोडून मोबाईल चोरून नेण्याचा हा तिसरा प्रकार आहे. दुकानात यापूर्वी दोन वेळा चोरी करणारे आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. दुकानाच्या शटरला दोन्ही बाजूस कुलपे व मध्यभागीसुध्दा लॉक असताना चोरट्यांनी शटरखाली जॅक लावून शटर उचकटले. शटरलगत असलेला लाकडी दरवाजा फोडून आत प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले.
मिरजेतील मोबाईल दुकानाचे शटर चोरट्यांनी उचकटून ऐवज लंपास केला.