माडग्याळच्या बाजारात पोलिसांनी दिला लाठीचा प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:27 AM2021-03-27T04:27:27+5:302021-03-27T04:27:27+5:30
माडग्याळ : माडग्याळ (ता. जत) येथील जनावरांच्या आठवडा बाजारात आलेल्या बाजारकरूंना अटकाव करण्यासाठी शुक्रवारी पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. अनेक ...
माडग्याळ : माडग्याळ (ता. जत) येथील जनावरांच्या आठवडा बाजारात आलेल्या बाजारकरूंना अटकाव करण्यासाठी शुक्रवारी पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. अनेक व्यापारी व शेतकऱ्यांना मार बसला. शेळ्या, मेंढ्या हातातून निसटून पळून गेल्याने गोंधळ उडाला.
माडग्याळ येथील जनावरांच्या आठवडा बाजारात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. सोलापूर, विजापूर, सांगोला, इस्लामपूर आदी भागातून व्यापारी आले होते. बंदी असतानाही बाजार भरवल्यामुळे उमदी पोलिसांनी सौम्य लाठीमार करून व्यापारी व शेतकऱ्यांना हाकलले. अनेक शेतकरी व व्यापाऱ्यांना लाठीचा प्रसाद खावा लागला. व्यापाऱ्यांनी खरेदी करून बांधलेली जनावरे सुटून इतरत्र गेली. शेळ्या, मेंढ्या हातातून निसटून पळून गेल्या. अचानक झालेल्या लाठीमारामुळे गोंधळ उडाला. बाजारकरू पळत सुटले. काही व्यापाऱ्यांचे पैसेही हरविल्याचे समजते. गावातील दुकानदारांनी दुकाने बंद केली.
गुरुवारी जत येथील बाजारात बाजार समितीकडे चौकशी करूनच बाजाराला आल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजार समितीने गेट पासही दिले असताना, आमच्यावर हा अन्याय का, असा सवाल विचारला जात आहे. पूर्वकल्पना न देता पोलिसांनी लाठीमार केल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.