महामार्गावर पोलिसांची ‘हप्तेबाजी’
By admin | Published: October 18, 2015 10:59 PM2015-10-18T22:59:23+5:302015-10-18T23:56:35+5:30
कासेगाव हद्दीतील प्रकार : कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली आर्थिक पिळवणूक
कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील मालखेड फाट्यानजीक कासेगाव हद्दीत महामार्ग पोलिसांनी पुन्हा एकदा ‘हप्ता वसुली’ जोरात सुरु केली आहे. शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास दोन गाड्यांतून आठ कर्मचारी जबरदस्तीने वाहनचालकांना अडवून, कागदपत्रे तपासणीच्या बहाण्याने लुबाडत होते.कासेगाव येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मालखेड फाट्यानजीक कासेगाव हद्दीत महामार्ग पोलीस वाहनधारकांना वेठीस धरून त्यांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी महामार्ग पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर हे पोलीस या ठिकाणापासून बेपत्ता होते. त्यामुळे नागरिकांसह वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. त्यानंतर हे महामार्ग पोलीस वाठार, पाचवड या ठिकाणी थांबत होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर पुन्हा हे पोलीस थांबून वाहनधारकांना त्रास देऊ लागले आहेत. दुचाकीस्वारांनाही अडवून, कागदपत्रांच्या नावाखाली त्यांची आर्थिक पिळवणूक करु लागले आहेत.
शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हे हायवे पोलीस दोन पोलीस गाड्यांतून या ठिकाणी थांबले होते. चारचाकी, दोनचाकी वाहनांना ते अडवत होते. कागदपत्रांची मागणी करुन, ती न दाखविल्यास कायद्याचा धाक दाखवून पैशाची मागणी करत होते. काही वेळेस वाहनधारकव त्यांच्यात बाचाबाचीही झाली. परंतु पैसे घेतल्याशिवाय ते वाहनांना जाऊ देत नव्हते. (वार्ताहर)
पठाणी बडगा : वसुलीसाठी कुरकुरे, चिक्कीही
आठ कर्मचाऱ्यांनी मिळून काही वेळातच बरीच माया गोळा करुन त्या ठिकाणाहून पोबारा केला. ही वसुली पुन्हा सुरु झाल्याने वाहनधारकांतून नाराजी व्यक्त होत आहे. इस्लामपूर-कराडदरम्यान प्रवासी वाहतूक करणाऱ्या शेकडो वाहनांची येथे दररोज वर्दळ असते. या वडापचालकांना या पथकाने लक्ष्य केल्याचे दिसते. मध्यंतरी कऱ्हाडमधून खाद्यपदार्थांची वाहतूक करणाऱ्या एका वाहनचालकाला अडवून पैशाची मागणी केली. त्याने पैसे देण्यास असमर्थता दर्शविल्यावर या पथकाने चक्क त्याच्या वाहनातील कुरकुरे, शेंगदाणा चिक्कीचे बॉक्स काढून घेतले. अशा पठाणी वसुलीमुळे वाहनधारक त्रस्त असून, तातडीने या वसुली टोळीवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.