सांगलीत फळ मार्केटला पोलिसांनी लावली शिस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 01:18 PM2020-04-23T13:18:24+5:302020-04-23T13:19:10+5:30
फळ मार्केटमध्ये प्रवेश देताना विक्रेत्याकडील ओळखपत्राची शहानिशा केली जात होती. किरकोळ पेटी, दोन पेटी आंबा खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना फळ मार्केटमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे गुरुवारी फळ मार्केटमध्ये होलसेल विक्रेत्याव्यतिरिक्त फारशी गर्दी दिसत नव्हती.
सांगली : संचारबंदीत विष्णू अण्णा फळमार्केटमध्ये खरेदीसाठी लोकांच्या होणाऱ्या गर्दीला आवर घालून सोशल डिस्टन्सिंगचा पालन करण्यासाठी पोलिस प्रशासनाने गुरुवारी ठोस पावले उचलली. फळ व्यापाºयाच्या दुकानासमोर बॅरिकेटस् लावून सुरक्षित अंतराची मर्यादा पाळण्यास भाग पाडले. किरकोळ फळ खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनाही प्रवेश नाकारत गर्दी टाळली. त्यामुळे फळ मार्केटला चांगली शिस्त लागली होती.
फळ मार्केटमध्ये सध्या आंब्यांचा हंगाम जोरात सुरू आहे. सकाळी आठपासूनच फळ मार्केटमध्ये गर्दी असते. त्यात किरकोळ ग्राहकासोबतच होलसेल विक्रेत्यांचा समावेश असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केल्यानंतरही फळ मार्केटमधील गर्दी कमी झालेली नव्हती. त्यात लोकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम पाळले जात नव्हते. काही दिवसांपूर्वी गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला होता. त्यानंतरही लोकांची गर्दी कायम राहिल्याने बुधवारी फळांचे सौदे एका मंगल कार्यालयाच्या मोकळ्या मैदानात काढण्यात आले. पण ही जागाही अपुरी पडू लागली. त्यानंतर पोलिस उपअधिक्षक अशोक वीरकर, सांगली शहरचे निरीक्षक अजय सिंदकर यांच्याशी व्यापाऱ्यांनी चर्चा करून पुन्हा फळ मार्केटमध्येच सौदे काढण्यास परवानगी देण्याची विनंती केली. त्यावर पोलिसांनी सुरक्षित अंतराची मर्यादा पाळण्याची सक्त सूचना करण्यात आली. बाजार समिती, फळ व्यापारी व पोलिसांच्या सहकार्याने प्रत्येक दुकानासमोर बॅरिकेटस् लावण्यात आले. सुरक्षित अंतर ठेवून फळांचा सौदा काढण्यात आला.
फळ मार्केटमध्ये प्रवेश देताना विक्रेत्याकडील ओळखपत्राची शहानिशा केली जात होती. किरकोळ पेटी, दोन पेटी आंबा खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना फळ मार्केटमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे गुरुवारी फळ मार्केटमध्ये होलसेल विक्रेत्याव्यतिरिक्त फारशी गर्दी दिसत नव्हती. त्यातच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचेही कठोर पालन केले जात होते. मास्क न वापरणाºयावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. पोलिसांनी घेतलेल्या पुढाकारामुळे महिन्यानंतर फळ मार्केटला चांगली शिस्त लागली होती.