पोलीस निरीक्षकासह दोघांना अटक
By admin | Published: July 11, 2017 12:00 AM2017-07-11T00:00:30+5:302017-07-11T00:00:30+5:30
पोलीस निरीक्षकासह दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जात पडताळणीचे प्रमाणपत्र मिळण्यास शिफारस करण्यासाठी दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी विभागीय जात पडताळणी कार्यालयाच्या दक्षता पथकाचा पोलीस निरीक्षक राजन माधवराव बेकनाळकर (वय ५६, रा. आर. के. नगर, प्लॉट क्रमांक ३९६, कोल्हापूर) याच्यासह त्याच्या खासगी वाहनावरील चालक दत्तात्रय दगडू दळवी (३६, आसुर्ले पोर्ले, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी अटक केली.
येथील जुना बुधगाव रस्त्यावरील समाजकल्याण कार्यालयातजात पडताळणी विभागाच्या दक्षता पथकाचे कार्यालय आहे. याठिकाणी राजन बेकनाळकर याची नियुक्ती आहे. तक्रारदार सांगली परिसरातील आहेत. त्यांना त्यांच्या बहिणीचे जात पडताळणी प्रमाणपत्र काढायचे होते. हे काम बेकनाळकरकडे होते. त्याने प्रमाणपत्र मिळण्यास कोल्हापूरच्या मुख्य कार्यालयात शिफारस करण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. ‘मी व माझा सहकारी तुमच्या घरी येतो, पाकीट तयार ठेवा’, असे त्याने सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने १६ एप्रिल २०१७ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून याची चौकशी सुरू होती. परंतु प्रत्यक्षात बेकनाळकरने लाचेची रक्कम स्वीकारली नाही; पण त्याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.
सोमवारी बेकनाळकर व त्याच्या खासगी वाहनावरील चालक दत्तात्रय दळवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. रात्री उशिरा दोघांनाही अटक केली. त्यांना मंगळवारी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. त्यांच्याविरुद्ध सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक परशराम पाटील, निरीक्षक सुनील गिड्डे, हवालदार श्रीपती देशपांडे, सुनील राऊत, सुनील कदम, संजय कुलगुटगी, जितेंद्र काळे, भास्कर भोरे, सचिन कुंभार, चंद्रकांत गायकवाड व दीपक धुमाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बेकनाळकर यांच्या कोल्हापुरातील घराची झडती
कोल्हापूर : पोलीस निरीक्षक राजन माधवराव बेकनाळकर यांच्या आर. के. नगर येथील घराची लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली. त्यामध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे सापडल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलीस निरीक्षक राजन बेकनाळकर हे सांगली जातपडताळणी कार्यालयात कार्यरत आहेत.
दीड हजार घेतले
तक्रारीची चौकशी सुरू केल्यानंतर बेकनाळकर व त्याचा चालक दळवी यांनी १६ एप्रिलला तक्रारदाराकडून दीड हजार रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्याविरुद्ध तक्रार दाखल झाल्याची चाहूल लागल्याने त्यांनी उर्वरित रक्कम घेतली नसावी, अशी चर्चा आहे.