सात खूनप्रकरणांचा तपास सांगली पोलिसांनी गुंडाळला
By admin | Published: March 27, 2016 11:28 PM2016-03-27T23:28:59+5:302016-03-28T00:04:45+5:30
तिघे अनोळखीच : संशयितांची नावे निष्पन्न; तरीही पोलिस ढिम्म
सचिन लाड-- सांगली --गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात झालेल्या खुनापैकी सात खुनांचा तपास पोलिसांनी गुंडाळला असल्याचे चित्र आहे. चार खुनात मृत दोन महिलांसह चौघांची अजूनही ओळख पटलेली नाही. ओळख पटविण्यासाठी पोलिस अगदी परराज्यात जाऊन आले. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. तीन खुनाचे धागेदोरे मिळाले, संशयितांची नावे निष्पन्न झाली होती. मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे पोलिसांनी धाडस दाखविले नाही. त्यामुळे या सर्व खुनांचा तपास फाईलबंद झाला आहे.
तीन वर्षापूर्वी भिलवडी (ता. पलूस) येथे दिवाळीच्या पहिल्याचदिवशी शंकर वारे व त्यांच्या सहा वर्षाच्या मुलाचा गळा चिरुन खून केल्याची घटना उघडकीस आली होती. हा खून वारे यांच्या शेतात झाला होता. खुनानंतर त्यांच्या शेतातील गडी रातोरात गायब झाला होता. त्यामुळे त्याच्यावरच पोलिसांचा संशय बळावला होता. खुनाचे कारण अजूनही उजेडात आणण्यात भिलवडी पोलिसांना यश आले नाही. तसेच गड्याचा शोधही लावता आला नाही. सांगलीतील पंचशीलनगरमध्ये राहणाऱ्या शशिकांत पावसकर या तरुणाचा खून होऊन दीड वर्षे होऊन गेली आहेत. अनैतिक संबंधातून त्याला हातपाय बांधून कृष्णा नदीत फेकून दिले होते. संशयितांची नावे निष्पन्न झाली होती, पण शहर पोलिसांचा तपास पुढे सरकला नाही. शेवटपर्यंत हा तपास संशयास्पद राहिल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण व गुंडाविरोधी पथकानेही या तपासात उडी घेतली नाही. कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी हा तपास पोलिस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्याकडे सोपविला होता. तरीही याचा छडा लागला नाही.
गतवर्षी येळावी (ता. तासगाव) येथे शेतात २५ ते २६ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तिचे हात-पाय तोडण्यात आले होते. ती सहा महिन्यांची गर्भवती होती. तिची ओळख पटविण्याचा हल्लेखोरांनी प्रयत्न केला होता. यात त्यांना यशही आले. त्यामुळे पोलिसांच्या हाती अजूनही या खुनाचे कोणतेही धागेदोरे लागले नाही. महिलेची ओळख पटविण्यासाठी तासगाव, स्थानिक गुन्हे अन्वेषण व गुंडाविरोधी पथक फार प्रयत्न केले. परंतु यश मिळाले नाही. महिन्यापूर्वी सलगरे (ता. मिरज) येथेही पोत्यात सडलेल्या अवस्थेत महिला व पुरुषाचा मृतदेह आढळून आला.
त्यांचाही खून करून ओळख पटविण्याचा हल्लेखोरांनी प्रयत्न केला आहे. या खुनातील मृतांची ओळख पटविण्यासाठी पोलिस परराज्यात जाऊन आले आहेत. खानापूर तालुक्यातही दोन महिन्यापूर्वी विहिरीत पोते आढळून आले होते. या पोत्यात पुरुषाचा सडलेल्या स्थितीत मृतदेह सापडला होता. त्याचेही हात-पाय तोडण्यात आले होते. या व्यक्तीही ओळख पटलेली नाही.
गुंडाविरोधी पथक आघाडीवर
गुंडाविरोधी पथकाने येळावीत खून झालेल्या महिलेची ओळख पटविण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. मृत महिला सहा महिन्याची गर्भवती होती. त्यामुळे जिल्ह्यातील प्रसुत रुग्णालयात चौकशी केली. विशेषत: एखाद्या महिलेने उपचारासाठी नाव नोंदले आहे, पण ती प्रसुतीसाठी दाखल झाली नाही, अशी कोण आहे का, याची चौकशी केली. परंतु तशी एकही महिला आढळून आली नाही. आधार कार्ड काढताना घेण्यात येणाऱ्या बोटांच्या ठशांवरून शोध घेण्यात आला. तरीही यश आले नाही.