‘थर्टी फर्स्ट’च्या जल्लोषावर पोलिसांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:27 AM2020-12-31T04:27:36+5:302020-12-31T04:27:36+5:30
सांगली : रात्री उशिरापर्यंत जल्लोष करत नववर्षाचे स्वागत करण्याचे नियोजन करत असाल तर जरा थांबा...यंदा थर्टी फर्स्टच्या जल्लोषावर पोलिसांची ...
सांगली : रात्री उशिरापर्यंत जल्लोष करत नववर्षाचे स्वागत करण्याचे नियोजन करत असाल तर जरा थांबा...यंदा थर्टी फर्स्टच्या जल्लोषावर पोलिसांची विशेष नजर असणार आहे शिवाय रात्रीची संचारबंदी लागू असल्याने रात्री अकराच्या अगोदरच कार्यक्रम उरकावे लागणार आहेत. रात्री अकरानंतर पोलिसांची कडक नाकाबंदी सुरू होणार असून उशिरापर्यंत चालू राहणाऱ्या धाबे, हॉटेल्ससह वाहनांचा आवाज करत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी ‘लोकमत’ला दिली.
दरवर्षी नववर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वजण तयारी करत असतात. हॉटेल्स, धाब्यासह इतर ठिकाणी कार्यक्रमांचे नियोजन केले जाते. यंदा कोरोनामुळे या जल्लोषावर मर्यादा आल्या आहेत. थर्टी फस्टला जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस सज्ज झाले आहेत.
कोरोना संसर्ग लक्षात घेता, पोलिसांना नागरीकांनी सहकार्य करावे. अकरानंतर संचारबंदी असल्याने ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येईल तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. नव्या वर्षाचे स्वागत साऱ्यांनी घरात राहूनच करावे. या कालावधीत कुठेही अडचणी येऊ नयेत म्हणून २४ तासांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचेही अधीक्षक गेडाम यांनी सांगितले.