सांगलीत गर्दी करणाऱ्यांना पोलिसांचा लाठीप्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:27 AM2021-05-06T04:27:24+5:302021-05-06T04:27:24+5:30

सांगली : सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी भाजीपाला, किराणा मालाच्या खरेदीसाठी गर्दी केली. मार्केट यार्डमध्ये पुन्हा बेशिस्तपणा ...

Police lathi prasad to the crowd in Sangli | सांगलीत गर्दी करणाऱ्यांना पोलिसांचा लाठीप्रसाद

सांगलीत गर्दी करणाऱ्यांना पोलिसांचा लाठीप्रसाद

Next

सांगली : सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी भाजीपाला, किराणा मालाच्या खरेदीसाठी गर्दी केली. मार्केट यार्डमध्ये पुन्हा बेशिस्तपणा दिसून आला. त्यामुळे पोलिसांनी गर्दी करणाऱ्यांना लाठीप्रसाद दिला.

जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून आठ दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाला. मात्र, बुधवारी सकाळी किराणा माल, भाजीपाला, बेकरी पदार्थ, धान्य खरेदीसाठी पुन्हा लोक रस्त्यावर आले. त्यामुळे पोलिसांनी कठोर पावले उचलत गर्दी हटविली. गर्दी करणाऱ्यांना चोपही दिला. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी गर्दी कमी होती. मात्र, लोकांचा वावर इतका होता की, सुरक्षित अंतराच्या नियमाचा फज्जा उडाला. अनेक दुकानांमध्ये लोक गर्दी करून होते.

सांगलीच्या मार्केट यार्डमध्ये पुन्हा वाहनांची व खरेदीदारांची गर्दी झाली. त्याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांचे एक पथक त्याठिकाणी आले. त्यांनी पूर्वेकडील प्रवेशद्वार बंद करून दुसऱ्या प्रवेशद्वाराने कारवाईस सुरुवात केली. गर्दीवर नियंत्रण न ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलिसांनी दुकान बंद करण्याच्या सूचना दिल्या. गर्दी करणाऱ्या लोकांना लाठीने चोप दिला. त्यामुळे खरेदीदारांची पळापळ झाली. अर्ध्या तासात मार्केट यार्ड सामसूम झाले.

जुन्या भाजी मंडईतही साडे दहा वाजता पोलिसांचे पथक दाखल झाले. त्यांनी विक्रेत्यांना व खरेदीदारांना हुसकावून लावले. सकाळी ११ पूर्वीच येथील मंडई व फळमार्केट बंद झाले. त्यानंतर पोलिसांनी मारुती रोड, हरभट रोड, कापड पेठ, गणपती पेठ याठिकाणी मोर्चा वळविला. त्याठिकाणच्या दुकानदारांनाही बेशिस्तपणाबद्दल समज दिली. त्यामुळे बुधवारी सकाळी साडे दहा वाजता सर्व पेठा शांत झाल्या.

चौकट

विक्रेते व पोलिसांत वाद

सांगलीच्या जुन्या भाजी मंडईतील कारवाईवेळी येथील संघटनेचे अध्यक्ष मुसाभाई सय्यद यांच्याकडे पोलीस काठी घेऊन धावले. व्यापार सुरू ठेवण्यावरून यावेळी वाद झाला.

चौकट

दिवसभर बाजारपेठा ओस

मंगळवारी रात्रीनंतर लॉकडाऊन सुरू झाला असला तरी बुधवारी दुपारी १२ वाजल्यापासूनच शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा शांत झाल्या. पोलिसांच्या कठोर पवित्र्यामुळे लोकांच्या फिरण्यावर अंकुश बसला. पोलिसांची तपासणी व कारवाईची मोहीम दिवसभर सुरू होती.

चौकट

माधवनगरमध्येही लोक रस्त्यावर

माधवनगर येथेही बुधवारी सकाळी लाेक खरेदीसाठी रस्त्यावर आले. किराणा माल, बेकरी पदार्थ, धान्य, दूध आदी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. याठिकाणी पोलीस फिरकले नसल्याने सकाळी आठ ते ११ वाजेपर्यंत नागरिक फिरत होते.

Web Title: Police lathi prasad to the crowd in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.