घराबाहेर फिरणाऱ्या कोरोनाबाधितांना पोलिसांची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:19 AM2021-07-21T04:19:14+5:302021-07-21T04:19:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : घरगुती विलगीकरणातील रुग्णांवर ग्राम दक्षता समित्यांनी कडक लक्ष ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : घरगुती विलगीकरणातील रुग्णांवर ग्राम दक्षता समित्यांनी कडक लक्ष ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले. पोलिसांनी अशा रुग्णांना नोटीस काढण्याचे आदेशही दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी खानापूर, विटा, मांगरूळ व खंबाळे येथे भेटी देऊन पाहणी केली. कोरोनास्थितीचा आढावा घेतला. आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवण्यास सांगितले. कोरोनाग्रस्त असलेल्या ठिकाणी बॅरिकेडिंग करून कंटेन्मेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींची चाचणी त्वरित करावी, असेही आदेश दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्यासह आरोग्यधिकारी, वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, विलगीकरणातील रुग्णांना चांगल्या सुविधा द्याव्यात. घरगुती विलगीकरणातील रुग्णांना नियमित भेटी देऊन ते घरातच असल्याची खातरजमा करावी. त्यांच्या हातावर शिक्के मारावेत. सार्वजनिक कार्यक्रम होणार नाहीत याची काळजी दक्षता समित्यांनी घ्यावी. लसीकरणासाठी दुसऱ्या डोसच्या लाभार्थींना प्राधान्य द्यावे. काही पोस्ट कोविड रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासते, यासाठी ग्रामीण रुग्णालयांकडे सोपविलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर रुग्णांना मोफत द्यावेत.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विलगीकरणातील रुग्णांशी संवाद साधला. औषधे, आरोग्य तपासणी व विविध सोयीसुविधांची माहिती घेतली.