पोलिस अधिकाऱ्यासह दोघे शरण!

By Admin | Published: October 11, 2016 12:18 AM2016-10-11T00:18:46+5:302016-10-11T00:19:45+5:30

संशयित आत्महत्या प्रकरण : न्यायालयात हजर; ‘सीआयडी’कडून अटक होणार

Police officer and two refugees! | पोलिस अधिकाऱ्यासह दोघे शरण!

पोलिस अधिकाऱ्यासह दोघे शरण!

googlenewsNext

सांगली : उमदी (ता. जत) येथील पोलिस ठाण्याच्या आवारातच संशयिताने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अटकेच्या भीतीने फरार झालेले उमदी (ता. जत) पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश सोपान वाघमोडे (वय ३५, विजापूर नाका, सोलापूर) व हवालदार प्रमोद मारुती रोडे (३०, रा. मल्लेवाडी, ता. मिरज) हे रविवारी सायंकाळी अखेर जत न्यायालयात शरण आले. गेल्या पाच महिन्यांपासून ते राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाला गुंगारा देत फरार होते.
न्यायालयाने वाघमोडे व रोडे या दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार जत पोलिसांनी रात्री उशिरा त्यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. हे दोघे हजर झाल्याचे समजताच सीआयडीने सोमवारी त्यांना अटकेच्या हालचाली सुरु केल्या. पण कागदपत्रांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे न्यायालयाकडून ताबा घेण्याचे आदेश मिळाले नाहीत. येत्या एक-दोन दिवसात न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन त्यांना अटक केली जाईल, असे पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी सांगितले. दरम्यान, या गुन्ह्यांतील पोलिस उपनिरीक्षक राजाराम चिंचोळकर हे अजूनही फरारी आहेत. गेल्या महिन्यात जत न्यायालयाने या तिघांविरुद्ध पकडवॉरंट जारी केले होते. त्यांना एक महिन्यात शरण येण्याची मुदत दिली होती. ही मुदत आज (सोमवार) पूर्ण होणार होती. तत्पूर्वीच वाघमोडे व रोडे जत न्यायालयात रविवारी हजर झाले. चिंचोळीकर हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांना आता न्यायालयाकडून फरारी घोषित केले जाणार आहे.
उमदीत मे २०१६ मध्ये एका महिलेचा खून झाला होता. याप्रकरणी उमदी पोलिसांनी चंद्रशेख नंदगोड यास चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ६ जूनला त्याने पोलिस ठाण्यातील शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकांनी केली होती. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सांगलीच्या सीआयडी विभागाकडे सोपविली होती. या विभागाच्या चौकशीत उमदी पोलिसांनी मारहाण तसेच डांबूून ठेवल्याने भीतीने नंदगोड याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक एन आर. पन्हाळकर यांनी वाघमोडे, चिंचोळीकर व रोडे याच्याविरुद्ध डांबून मारहाण करणे व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद केला. याची चाहूल लागताच या तिघांनी पलायन केले होते. (प्रतिनिधी)


पट्टा, काठीने मारहाण
महिलेच्या खूनप्रकरणी नंदगोड यास ४ जूनला ताब्यात घेतले होते. मृत महिलेच्या मोबाईलवर शेवटचा कॉल त्याचाच होता. त्याच्याविरुद्ध पुरावेही भरपूर होते. उमदी पोलिस त्याला अटक करू शकत होते; पण त्यांनी तसे केले नाही. गुन्हा कबूल करण्यासाठी त्यांनी बेदम मारहाण केल्याचे सीआयडीच्या चौकशीत निष्पन्न झाले. त्याला पट्टा तसेच काठीने बेदम मारहाण केली. तीन दिवस त्यास डांबून ठेवले. पोलिसांच्या मारहाणीला घाबरुनच त्याने आत्महत्या केली. त्याच्या मृतदेहाची विच्छेदन तपासणी करण्यात आली. यामध्ये त्याच्या अंगावर एकूण १२ जखमा आढळून आल्या आहेत. यातील गळ्यावरील एक जखम त्याने गळफासाने आत्महत्या केल्याची आहे. उर्वरित
११ जखमा पोलिसांच्या मारहाणीतील असल्याचे स्पष्ट झाले होते. या महत्त्वाच्या पुराव्यावरच वाघमोडे, चिंचोळीकर व रोडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.


पोलिसांचे कुठे चुकले?
नंदगोडला इंडीतून गुपचूप उचलले. इंडी पोलिस, तसेच नातेवाइकांना त्याला ताब्यात घेतल्याची माहिती दिली नाही. त्याला ताब्यात घेतल्याची पोलिस दप्तरी साधी ‘एन्ट्री’ही केली नव्हती. एकदाही त्याची वैद्यकीय तपासणी केली नाही. वकिलांची भेट घेऊ दिली नाही. तीन दिवस ताब्यात ठेवूनही अटक दाखविली नाही.

चार महिने पळाले
गुन्हा दाखल होताच वाघमोडे, चिंचोळकर व रोडे फरार झाले. या काळात त्यांनी जिल्हा तसेच मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन घेण्याचा प्रयत्न केला. जिल्हा न्यायालयाने तर त्यांना दोनवेळा जामीन फेटाळला. जत न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध पकडवॉरंट जारी केले. न्यायालयाकडून जामीन घेण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने अखेर शरण येण्याशिवाय त्यांच्यापुढे कोणताच पर्याय उरला नव्हता.

Web Title: Police officer and two refugees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.