बेशिस्तांवर कारवाईसाठी पोलीस अधिकारी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:19 AM2021-07-16T04:19:13+5:302021-07-16T04:19:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनास्थिती कायम असल्याने लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांनाही न जुमानता फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी आज पोलिसांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनास्थिती कायम असल्याने लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांनाही न जुमानता फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी आज पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत सुरू असलेली भाजीमंडई आणि इतर विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी स्वत: मारुतीरोड, हरभटरोड, कापड पेठेत फिरून काहींचे प्रबोधन तर काहींवर कारवाई केली.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कायम राहत असल्याने प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत. पॉझिटिव्हिटी रेटमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेऊन आठवड्यात दोनवेळा नव्याने निर्बंध लागू केले आहेत. तरीही अनेकजण मास्क न लावता व विनाकारण बाहेर फिरताना आढळून येत आहेत. प्रशासनाच्या आवाहनाला न जुमानता सुरू असलेल्या भाजीबाजारातही कोणत्याही नियमांची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत. अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले फौजफाट्यासह गुरुवारी सकाळी मारुती चौकात हजर झाल्या. यावेळी रस्त्यावरील गर्दी कायम होती, तर काही दुकानांमध्येही गर्दी होती. भाजीमंडईतही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी कठोर भूमिका घेत कारवाईस सुरुवात केली. त्यानंतर दुबुले यांनी स्वत: बाजारपेठेत फेरी मारून कारवाईचा बडगा उगारण्यापेक्षा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.
पोलीस उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्यासह शहर पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला.
चौकट
अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले म्हणाल्या, जिल्ह्यातील कोरोना संसर्ग अद्यापही कायम आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांना नागरिकांनीही सहकार्य करावे अन्यथा पाेलिसांकडून कडक कारवाई सुरू करण्यात येईल.