पोलीस अधिकाऱ्यांच्या निवडणुकीपूर्वी बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:23 AM2019-01-25T00:23:34+5:302019-01-25T00:24:02+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस मुख्यालयाने जिल्ह्यातील तीन वर्षे कालावधी पूर्ण झालेल्या, मूळ जिल्ह्यात नियुक्ती व गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाºयांची माहिती
मिरज : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस मुख्यालयाने जिल्ह्यातील तीन वर्षे कालावधी पूर्ण झालेल्या, मूळ जिल्ह्यात नियुक्ती व गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाºयांची माहिती मागविली आहे. संबंधित अधिकाºयांच्या निवडणुकीपूर्वी बदल्या करण्यात येणार आहेत.
एप्रिल व मेमध्ये होणाºया लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पोलीस महासंचालकांनी प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांपासून उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाºयांची माहिती मागविली आहे. मूळ जिल्ह्यात नियुक्ती, मागील चार वर्षात खंडित, अखंडित व पदोन्नतीपूर्वीच्या कालावधीसह तीन वर्षे जिल्ह्यात पूर्ण झालेले अधिकारी, २००४, २००९ व २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुका व पोटनिवडणुकीदरम्यान त्याच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाºयांसह, फौजदारी गुन्हे न्यायप्रविष्ट असलेल्या अधिकाºयांची यादी त्यांच्या सेवा तपशिलासह दि. ३० जानेवारीपर्यंत मागविण्यात आली आहे.
मूळ जिल्ह्यात नियुक्ती, तीन वर्षे जिल्ह्यात पूर्ण झालेले अधिकारी व गत निवडणुकांत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाºयांच्या अन्य जिल्ह्यात बदल्या करण्यात येणार आहेत. मात्र पोलीस नियंत्रण कक्ष, सुरक्षा शाखा, वाहतूक शाखा, पोलीस मुख्यालय, बॉम्बशोधक पथक, अतिक्रमण विभाग, महिला तक्रार निवारण कक्ष, पोलीस कल्याण शाखा, न्यायालयीन कामकाज विभागाकडे काम करणाºया पोलीस अधिकाºयांचा निवडणूक कामकाजाशी संबंध येत नसल्याने त्यांची नावे निवडणुकीसाठी करावयाच्या बदल्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात येऊ नयेत, असे अप्पर पोलीस महासंचालकांच्या परिपत्रकात म्हटले आहे.
अनेक वर्षांपासून : कर्मचाºयांचे ठाण
लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुका होणार असल्याने अनेक वर्षे जिल्ह्यात तळ ठोकलेल्या अधिकाºयांना अन्यत्र जावे लागणार आहे. जिल्हा पोलीस दलात सध्या अनेक पोलीस अधिकारी मूळ जिल्ह्यात नियुक्तीस आहेत. अनेक अधिकाºयांचा कालावधी पूर्ण झाला आहे. खात्याअंतर्गत पदोन्नती मिळालेले अनेक उपनिरीक्षक जिल्ह्यात असून, काहीजणांचा निवृत्तीसाठी वर्षभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. अशा सर्वांना जिल्ह्याबाहेर जावे लागणार आहे. अधिकाºयांनंतर एकाच पोलीस ठाण्यात अनेक वर्षे काम करणाºया पोलीस कर्मचाºयांच्याही जिल्ह्याअंतर्गत बदल्या होणार आहेत. फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या पोलीस कर्मचाºयांनाही निवडणूक कामकाजापासून दूर ठेवण्यात येणार आहे.