‘एक गाव-एक गणपती’साठी पोलिस पाटलांनी पुढाकार घ्यावा
By admin | Published: July 26, 2016 11:49 PM2016-07-26T23:49:48+5:302016-07-27T01:06:53+5:30
कृष्णांत पिंगळे : तासगाव तालुक्यातील पोलिस पाटलांना मार्गदर्शन
तासगाव : पोलिसपाटील पदाच्या माध्यमातून गावाचे हित साधण्यासाठी खूप मोठी संधी आहे. त्याची सुरुवात गणेशोत्सवापासून करा. ‘एक गाव एक गणपती’साठी पोलिस पाटलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांनी केले.
नव्याने नियुक्त झालेल्या पोलिस पाटलांना मार्गदर्शन करण्यासाठी तासगाव पोलिस ठाण्यात बैठक झाली. यावेळी तहसीलदार सुधाकर भोसले, पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक धनाजी पिसाळ उपस्थित होते.
पोलिस उपअधीक्षक पिंगळे म्हणाले, पोलिसपाटील हा गावाच्या एकात्मतेसाठी महत्त्वाचा घटक आहे. प्रशासन आणि जनतेमधील दुवा म्हणून पोलिस पाटलांनी काम करावे. गावातील अवैध, बेकायदा धंदे मोडीत काढण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. गावातील एकात्मता कायम ठेवण्यासाठी, जाती, धर्म, राजकारण, गट-तट बाजूला ठेवून पोलिस पाटलांचे काम व्हायला हवे. त्याची सुरुवात गणेशोत्सवापासून करा. तालुक्यातील प्रत्येक गावात ‘एक गाव एक गणपती’साठी पुढाकार घ्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तहसीलदार सुधाकर भोसले यांनीही महसूल यंत्रणेबाबत पोलिस पाटलांच्या भूमिकेबाबत मार्गदर्शन केले. बेकायदा कामांना आळा घालण्यासाठी पोलिस पाटलांची कामगिरी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
गावनिहाय बैठका
‘एक गाव, एक गणपती’साठी लवकरच गावनिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. गावातील सर्व मंडळांना एकत्रित बोलावून अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येईल. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा, यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे पिंगळे यांनी सांगितले.