सांगलीत उद्यापासून पोलिस भरती
By admin | Published: March 20, 2017 11:44 PM2017-03-20T23:44:31+5:302017-03-20T23:44:31+5:30
तयारी पूर्ण : रस्ते बंद राहणार; ५३ जागांसाठी चार हजार उमेदवारांचे अर्ज
सांगली : जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपाई या पदासाठी बुधवारपासून भरतीला प्रारंभ होत आहे. केवळ ५३ जागांसाठी ही भरती होत असून, यासाठी सुमारे चार हजार १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. भरती प्रक्रियेच्या कालावधित सकाळी सहा ते दहापर्यंत जिल्हा परिषद अध्यक्षांचे निवासस्थान ते ट्रॅफिक पार्क-कृष्णा मॅरेज हॉल मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे.
भरतीसाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज दाखल करण्याची सोमवारी शेवटची मुदत होती. सायंकाळपर्यंत चार हजार १४ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. विश्रामबाग येथील पोलिस मुख्यालयातील कवायत मैदानावर भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख कृष्णकांत उपाध्याय यांनी सोमवारी भरतीच्या तयारीची पाहणी केली. अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही सूचनाही दिल्या. २२ मार्चला (बुधवार) सकाळी दहा वाजता भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. दररोज दीड हजार उमेदवारांना बोलाविण्यात आले आहे. सकाळी सहा वाजता सह्याद्रीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कृष्णा मॅरेज हॉलच्या गेटमधून उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे.
भरतीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सकाळी सहा ते दहापर्यंत जिल्हा परिषद अध्यक्षांचे निवासस्थान ते ट्रॅफिक पार्क-कृष्णा मॅरेज हॉल मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला तसेच कुपवाड रस्त्यावरील चाणक्य हॉटेल ते मारूती मंदिर या मार्गावर सोळाशे मीटर धावणे घेतले जाणार असल्याने हा मार्गही सकाळी सहा ते दहापर्यंत बंद ठेवला आहे. (प्रतिनिधी)