कामगारांची पोलिसांत नोंद बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:40 AM2020-12-16T04:40:35+5:302020-12-16T04:40:35+5:30
सांगली : व्यापारी, उद्योजकांकडे परप्रांतीय, अनोळखी कामगार काम करीत असतात. त्याची पोलीस ठाण्यात नोंद बंधनकारक असतानाही व्यापारी वर्गाकडून अपेक्षित ...
सांगली : व्यापारी, उद्योजकांकडे परप्रांतीय, अनोळखी कामगार काम करीत असतात. त्याची पोलीस ठाण्यात नोंद बंधनकारक असतानाही व्यापारी वर्गाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यातून चोरीच्या घटना घडल्यास पोलिसांना तपासात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी निष्काळजीपणाने वागू नये, असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक अजय टिके व निरीक्षक अजय सिंदकर यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत केले.
सोने घेऊन पसार झालेल्या पश्चिम बंगाल येथील एका चोरट्याला पोलिसांच्या सतर्कतेमुळे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या गुन्ह्याची माहिती देताना कामगारांबाबत होणाऱ्या निष्काळीजपणावरही त्यांनी मत मांडले. टिके म्हणाले की, शहरातील अनेक दुकाने, उद्योगात पश्चिम बंगाल, बिहारसह इतर राज्यातील कामगार काम करतात. व्यापारीही त्यांच्यावर विश्वास दाखवितात; पण त्यातून अनेकदा फसवणूक, चोरीचे प्रकार घडत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कामगाराला कामावर घेतानाच त्याचे नाव, पत्ता, नातेवाईक अशी माहिती घेतली पाहिजे. खातरजमा केल्यानंतरच कामावर ठेवले पाहिजे; पण यात निष्काळजीपणा होत असल्याचे दिसून येत आहे.
कामगार, भाडेकरू यांची पोलीस ठाण्यात नोंद करणे बंधनकारक आहे. पण त्याबाबत नागरिक, व्यापाऱ्यांकडून काळजी घेतली जात नाही. त्यातून चोरीच्या घटना घडल्यास संशयिताचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हानात्मक असते, असेही ते म्हणाले.