निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:22 AM2021-01-14T04:22:19+5:302021-01-14T04:22:19+5:30
सांगली : जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींसाठी उद्या, शुक्रवारी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांसह गावांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात ...
सांगली : जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींसाठी उद्या, शुक्रवारी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांसह गावांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मतदान व मतमोजणी लक्षात घेता निवडणुका होत असलेल्या ठिकाणी अनुचित प्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.
जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. यात ९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने १४३ ग्रामपंचायतींसाठी बुधवारी सायंकाळी प्रचाराची सांगता झाली. संवेदनशील व सध्या निवडणूक होत असलेल्या गावांमध्ये गुरुवारपासूनच बंदोबस्त असणार आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावांत पोलिसांनी संचलन केले आहे. आता शुक्रवारी मतदान तर सोमवार दि. १८ रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलीस बंदोबस्त कायम असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या नियमांचे पालन करून बंदोबस्त असणार असल्याचेही गेडाम यांनी सांगितले.
चौकट
बंदोबस्तासाठी कार्यरत कर्मचारी
उपअधीक्षक ०७
पोलीस निरीक्षक १२
सहायक उपनिरीक्षक ७१
कर्मचारी १४००