पीएसआय असल्याचे भासवत लुटणारा पोलीस निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:19 AM2021-06-18T04:19:51+5:302021-06-18T04:19:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पलूस : पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) असल्याचे सांगत दुचाकीस्वाराला अडवून पैसे काढून घेणाऱ्या पोलिसास निलंबित करण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पलूस : पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) असल्याचे सांगत दुचाकीस्वाराला अडवून पैसे काढून घेणाऱ्या पोलिसास निलंबित करण्यात आले. राहुल दिलीप मदने (रा. पलूस) असे त्याचे नाव असून, पोलीस मुख्यालयात तो नेमणुकीस होता. पोलिसाकडूनच झालेल्या अडवणुकीच्या प्रकाराची पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी गंभीर दखल घेत ही कारवाई केली.
मंगळवार दि. १५ रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरीस असलेले मनोज शिवाजी गायगवाळे (रा. देवराष्ट्रे) हे घरी जात होते. जुना सातारा रोडने आंधळी फाटा येथे ते आले असता, पोलीस कर्मचारी राहुल मदने व त्याचा मित्र रोहन कांबळे तेथे आले. ‘मी पीएसआय असून एवढ्या रात्री कुठे चालला आहेस’, असे म्हणत गायगवाळे यांना शिवीगाळ सुरू केली व ‘खिशातील सर्व पैसे दे नाही तर उद्या कोर्टात दंड भरावा लागेल’ असा दम भरला. त्यानंतर मदने याने गायगवाळे यांच्याकडील ३,७७० रुपये काढून घेतले.
पोलिसानेच अशी अडवणूक केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक गेडाम यांनी मदने यास निलंबित केले आहे. मूळचा पलूस येथील मदनेबद्दल अनेक तक्रारी होत्या.