पोलीस-‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट सांगलीत मोर्चा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध ओतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 11:35 PM2018-05-10T23:35:34+5:302018-05-10T23:35:34+5:30
सांगली : उसाच्या एफआरपीची रक्कम तातडीने मिळावी व दुधाचे दर घसरत चालल्याने दूध उत्पादक आर्थिक संकटात सापडल्याने दूध दरवाढ तातडीने करावी, यासह
सांगली : उसाच्या एफआरपीची रक्कम तातडीने मिळावी व दुधाचे दर घसरत चालल्याने दूध उत्पादक आर्थिक संकटात सापडल्याने दूध दरवाढ तातडीने करावी, यासह इतर मागण्यांसाठी गुरूवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी प्रवेशद्वारातून आत जाण्यावरून आंदोलक व पोलिसांत झटापट झाली. निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर दूध ओतण्यात आले.
विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चास प्रारंभ झाला. यावेळी भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात येत होत्या. आंदोलकांनी निवेदनात म्हटले आहे की, यंदाचा ऊस गळीत हंगाम संपला तरी, अद्याप एफआरपीची रक्कम कारखानदारांनी दिलेली नाही. देशात साखरेचे चांगले उत्पादन होऊनही केंद्र सरकारने पाकिस्तानकडून साखर आयात केली. आता वाढीव पॅकेज जाहीर केल्याशिवाय येत्या गळीत हंगामात एकही साखर कारखाना चालू देणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
सध्या दुधाचे प्रतिलिटर १८ रूपये दर असल्याने दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. ३.५ फॅटला २७ रूपये दर जाहीर करूनही तो दर दिला जात नाही. यासाठी एकाही दूध संघावर सरकारने कारवाई केली नाही. खा. राजू शेट्टी संसदेत दोन विधेयक मांडणार आहेत. त्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांना सादर करण्यात आले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संजय बेले, महावीर पाटील, संदीप राजोबा, वैभव चौगुले, जि. प. सदस्या सुरेखा आडमुठे, जयकुमार कोले, अशोक खाडे, बी. आर. पाटील, संजय खोलकुंबे, पोपट मोरे उपस्थित होते.
आंदोलनस्थळी तणावाचे : वातावरण
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर आंदोलकांनी प्रवेशद्वारातून आत जाऊन आंदोलन करण्याचा आग्रह धरला. त्यास पोलिसांनी विरोध केल्याने आंदोलनस्थळी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आंदोलक आणि पोलिसांत झटापट झाली. त्याचवेळी काही तरूण सांगली-मिरज मार्गावर जाऊन बसल्याने वाहतूकही काही वेळासाठी ठप्प झाली होती. याचवेळी शासनाचा निषेध म्हणून प्रवेशद्वारासमोरच दूध ओतण्यात आले. अखेर पोलिसांनी सहकार्याचे आवाहन केल्यानंतर आंदोलक शांत झाले.