पतीची पहिल्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी पोलिसांत तक्रार : न्यायालयाने दंड ठोठावल्याचा राग
By admin | Published: May 10, 2014 11:47 PM2014-05-10T23:47:54+5:302014-05-10T23:47:54+5:30
विटा : कौटुंबिक हिंसाचारापासून महिला संरक्षण कायद्यांतर्गत सुरू असलेल्या खटल्यास गैरहजर राहिल्याप्रकरणी विटा न्यायालयाने १५० रुपये दंड
विटा : कौटुंबिक हिंसाचारापासून महिला संरक्षण कायद्यांतर्गत सुरू असलेल्या खटल्यास गैरहजर राहिल्याप्रकरणी विटा न्यायालयाने १५० रुपये दंड ठोठावल्याचा राग मनात धरून येतगाव (ता. कडेगाव) येथील पती प्रवीण आनंदा पाटील यांनी पहिली पत्नी सौ. राधिका प्रवीण पाटील यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास येथील कºहाड रस्त्यावरील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यासमोर रस्त्यावर घडली. याप्रकरणी प्रवीण पाटील यांच्याविरुध्द विटा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. येतगाव येथील राधिका हिचा विवाह त्याच गावातील प्रवीण पाटील यांच्याशी दि. ११ मार्च २०१२ रोजी झाला होता. मात्र एक महिन्यानंतर पती-पत्नीत वाद होऊ लागले. त्यानंतर दि. १५ जुलै २०१३ रोजी प्रवीण यांनी चाफळ येथील राममंदिरात दुसर्या मुलीशी विवाह केला. त्यामुळे पहिली पत्नी सौ. राधिका हिने पती प्रवीण यांच्याविरुध्द विटा न्यायालयात कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत खटला दाखल केला. मात्र या खटल्यास प्रवीण हजर होत नव्हते. काल शुक्रवारी सुनावणी असल्याने प्रवीण विटा न्यायालयात आले. त्यावेळी न्या. ससाणे यांनी प्रवीण यांना सुनावणीस हजर होत नसल्याने १५० रुपये दंड ठोठावला. त्यानंतर पत्नी राधिका व तिचे वडील येतगावला जाण्यासाठी क्रांतिसिंह पुतळ्याजवळ उभे होते. वडील औषध दुकानात गेल्याचे पाहून प्रवीण हे दुचाकीवरून राधिकाजवळ आले व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आज राधिकाने प्रवीण यांच्याविरुध्द विटा पोलिसांत तक्रार दिली असून, सहाय्यक पोलीस फौजदार व्ही. एल. शेळके तपास करीत आहेत. (वार्ताहर)