पोलिसांच्या हातावर तुरी; महिलेचे पलायन
By admin | Published: October 31, 2014 12:56 AM2014-10-31T00:56:22+5:302014-10-31T01:12:34+5:30
गुरुवारी रात्री ही घटना घडली.
सांगली : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एका संशयित चोरट्या महिलेने चक्क शहर पोलीस ठाण्यातून ‘फिल्मी स्टाईल’ने धूम ठोकली. गुरुवारी रात्री ही घटना घडली. घटनेनंतर या महिलेस पकडून देणाऱ्या नागरिकांनी पोलिसांच्या वर्तणुकीबद्दल संताप व्यक्त केला. नागरिक चोर पकडून पोलिसांकडे देतात आणि पोलीस चोरास सोडून देतात, असा त्यांनी आरोप केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंचमुखी मारुती रस्त्यावर कपडे विक्रीचे दुकान आहे. आठवड्यापूर्वी या दुकानात चोरी झाली होती. दुकान मालकाने शहर पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. तोपर्यंत गुरुवारी सायंकाळी दुकानात एक महिला खरेदीच्या निमित्ताने आली होती. यावेळी तिला चोरी करताना मालकाने रंगेहात पकडले. चोरट्या महिलेस पकडल्याचे वृत्त समजताच परिसरातील व्यावसायिकांनी मोठी गर्दी केली होती. या सर्वांनी संशयित महिलेस शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलीस निरीक्षक राजू मोरे यांच्या कक्षामध्ये या महिलेची चौकशी केली जात होती. तिच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी करण्यात आली, त्यावेळी पिशवीत दागिने व अन्य काही चोरीतील वस्तू सापडल्या. पोलीस तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करीत होते. तोपर्यंत तिने सर्वांची नजर चुकवून ठाण्यातून ‘धूम’ ठोकली. ठाण्यात गर्दी होती. कोण पळून जातंय, हे कोणाला समजले नाही. संशयित महिला पळून गेल्याचे समजताच पोलिसांनी तिचा शोध सुरु केला होता. (प्रतिनिधी)